नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक दिग्गजांनी नवी मुंबईत भाजपचे कमळ हाती घेतल्यावर ऐन निवडणुकीच्या धामधुमीत कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष दशरथ भगत, ठाणे जिल्हा कॉंग्रेस युवा अध्यक्ष निशांत भगत यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी भाजपचे महाराष्ट्र प्रभारी संजय उपाध्याय, भाजप नवी मुंबई अध्यक्ष रामचंद्र घरत, माजी पालकमंत्री गणेश नाईक, माजी आमदार संदीप नाईक, माजी खासदार संजीव नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार मंदा म्हात्रे मात्र अनुपस्थित होत्या.

ही सर्व धडपड केवळ देशाच्या विकासासाठीच आहे, असे सांगत भाजपमध्ये ज्यांनी प्रवेश केला आहे, त्यांना निराश करणार नाही. गणेश नाईक विक्रमी मतांनी निवडून येतील, असा विश्वास यावेळी संजय उपाध्याय यांनी व्यक्त केला. यावेळी कॉंग्रेसमधून भाजपत प्रवेश केलेले दशरथ भगत यांनी, नवी मुंबईत काँग्रेसची सत्ता कधीच नव्हती. आम्ही विकासासाठी किती संघर्ष करायचा. खरेच विकास करावयाचा असेल तर मुख्य प्रवाहात असणे गरजेचे आहे, यामुळे भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचे सांगितले. आम्हाला खुर्ची उचलण्याचे काम दिले तरी ते आम्ही करणार. शेवटी पक्ष आदेश महत्त्वाचा आहे, असेही यावेळी त्यांनी सांगितले.

आजच्या तरुणांना रोटी, कपडा, मकान यापेक्षा स्वाभिमान महत्त्वाचा वाटतो. ३७० व ३५ ए कलम रद्द केले, हे चांगले केले. मात्र, पूर्वजांनी केलेली सर्व कामे वाईट म्हणता येत नाहीत. निवडणूक या वैचारिक लढाईकडे सकारात्मक पाहावे, असे यावेळी गणेश नाईक यांनी सांगितले.

कॉंग्रेसच्या फशीबाई भगत, अंजली वाळुंज, वैजयंती भगत, हेमांगी सोनवणे, रुपाली भगत यांचाही प्रवेश भाजपत होणार आहे, मात्र तांत्रिक अडचण असल्याने थेट प्रवेश सध्या घेण्यात आला नाही, असे यावेळी सांगण्यात आले.

मंदा म्हात्रे यांच्या अनुपस्थितीवर दशरथ भगत यांनी मी आयोजक नाही असे सांगितले, तर भाजप जिल्हाध्यक्ष घरत यांनी मंदा म्हात्रे या कामात असल्याने येऊ  शकल्या नाहीत, असे सांगत वेळ मारून नेली.  याबाबत मला माहिती देण्यात आली नव्हती. दशरथ भगत यांची माझी भेट काही दिवसांपूर्वी झाली होती, मात्र त्यांनी भाजप प्रवेशाबाबत कल्पना दिली नाही, असे मंदा म्हात्रे सांगितले.