राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांचे पालिका आयुक्तांबद्दल अपशब्द

नवी मुंबई शहरातील नागरी कामात पालिका आयुक्त अडथळा आणत असून या धोंडय़ाने आठ दिवसांत योग्य ती कामे मंजूर केली नाहीत तर त्यांना त्यांची जागा दाखवून दिली जाईल, असे अपशब्द वापरत नवी मुंबई पालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांनी महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्यावर हल्लाबोल केला. त्यामुळे गेली अनेक दिवस पालिका सभागृहात धुमसत असलेला आयुक्त व सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वाद चव्हाटय़ावर आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्रास देण्यासाठीच राज्य सरकारने प्रथम मुंढे आणि आता धोंडे (डॉ. रामास्वामी) असे आयुक्त पाठवल्याचा आरोप नाईक यांनी एका सभेत बोलताना केला.

नवी मुंबई पालिकेत सध्या सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस व प्रशासन असा वाद शिगेला पोहचला आहे. गेली सहा महिने पालिका वर्तुळात सुरू असलेला हा वाद नाईक यांनी जाहीर सभेत आणला आहे. माजी पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या काळात अवाक्षर न काढणाऱ्या नाईक यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शांत, संयमी आणि पारदर्शक आयुक्त डॉ. रामास्वामी यांच्यावर जुईनगर व नेरुळ येथील जाहीर कार्यक्रमात तोफ डागली. ‘मोरबे, पामबीच, वंडर पार्क, यासारखे प्रकल्प आता जुने झाले असून नवीन सांगण्यासारखे काही नाही. त्यामुळे ‘सिटी मोबिलिटी’ अंतर्गत पामबीच मार्गावर चार उड्डाणपूल आणि सर्व पावसाळी नाल्यांची पुनर्बाधणी यासारखे डिफर पेमेंट प्रकल्प (हे प्रकल्प कंत्राटदार स्वखर्चाने बांधणार आणि पालिका सात वर्षांत हा खर्च टप्प्याटप्प्याने व्याजासह देणार) राबविण्याचा प्रस्ताव प्रशासनाला देण्यात आला आहे पण त्याला आयुक्तांनी खोडा घातला आहे,’ अशी टीका नाईक यांनी केली. ‘आम्ही या शहराचे राज्यकर्ते आहोत. दोन-तीन वर्षांसाठी येणारे सनदी अधिकारी नाहीत. हा धोंडा (दगड) शहर प्रगतीच्या आड कसा आला आहे हे जाहीर केले जाईल,’ असेही ते म्हणाले.

आयुक्त आणि सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दरी निर्माण होण्याची अनेक कारणे आहेत. त्यात पहिले कारण आयुक्तांनी शहरातील सर्व नागरी कामांच्या निविदा या अंदाज पत्रकानुसार करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे कंत्राटदार हवालदिल झालेले आहेत. नोकरभरती शासनाच्या ऑनलाइन पद्धतीने करण्यात आली. चिक्कीचे दर कमी करून कंत्राटदाराची पंचाईत केली. एका नगररचना संचालकाला माघारी पाठविण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेने घेतला. आयुक्तांनी त्या अधिकाऱ्याला अद्याप कार्यमुक्त केलेले नाही. त्यामुळे आयुक्तांना इशारे दिले जात आहेत.

नाईक शक्यतो कोणाबद्दल वाईट बोलत नाहीत, मात्र शिवसेना -भाजप युती झाल्यापासून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. नवी मुंबईचे आयुक्त अतिशय चांगले काम करीत असून त्यांनी यापूर्वी एक लाखाचे काम एक कोटीवर नेण्याच्या अयोग्य पद्धतीला आळा घातला आहे. नागरी कामांसाठी खर्च होणारा पैसा हा जनतेचा पैसा आहे. त्याचा विनियोग कसा करावा हे आयुक्त जाणतात. वैयक्तिक कामे होत नसल्याने त्यांना दगडधोंडय़ाची उपमा दिली जात आहेत.

– मंदा म्हात्रे, आमदार, बेलापूर

युती जाहीर झाल्यापासून नाईक वेडे झाले आहेत. ते आता काहीही बरळण्याची शक्यता आहे. यानंतरही ते असेच बोलणार आहेत. आयुक्त हे एक प्रामाणिक आधिकारी असून जनतेच्या हिताची कामे ते करीत आहेत.

– विजय नाहटा, उपनेते, शिवसेना

कार्यक्षम, प्रामाणिक अधिकारी सत्ताधारी राष्ट्रवादीला नको आहेत. यापूर्वी मुंढे यांना हटविण्यासाठी जंगजंग पछाडले. या आयुक्तांच्या काळात सर्वाची कामे होत आहेत. ते लोकहिताची कामे करीत आहेत.

– विजय चौगुले, विरोधी पक्षनेता, नवी मुंबई पालिका

पत्रकारांवरदेखील आगपाखड

आयुक्तांना दगड-धोंडय़ाची उपमा देणाऱ्या नाईक यांनी पत्रकारांवरदेखील आगपाखड केली. आमच्या चांगल्या कामांना प्रसिद्धी देत नसल्याचा आरोप करून नाईक यांनी पत्रकरांबाबत ‘थर्डक्लास’ असा शब्दप्रयोग केला आहे.