21 February 2019

News Flash

गॅसवाहिनीवरून श्रेयवादाचा भडका

संपूर्ण नवी मुंबईमध्ये घरगुती गॅस वाहिनीद्वारे पुरवण्याचे काम महानगर गॅसने हाती घेतले आहे.

संग्रहित प्रतिनिधिक छायाचित्र

जुईनगरमध्ये राष्ट्रवादी, शिवसेनेत आरोप-प्रत्यारोप

जुईनगरमध्ये महानगर गॅसने गॅसवाहिनी पोहोचवली असली तरीही त्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत श्रेयवाद सुरू झाला आहे. आगामी लोकसभा व विधानसभा डोळ्यांसमोर ठेवून शहरातील विविध राजकीय पक्षांत आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना आता गॅसवाहिनी हा नवीन मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.

संपूर्ण नवी मुंबईमध्ये घरगुती गॅस वाहिनीद्वारे पुरवण्याचे काम महानगर गॅसने हाती घेतले आहे. नेरुळ, सीवूडस, वाशीसह शहराच्या विविध भागांत पाइप गॅसचा पुरवठा केला जात आहे. जुईनगर परिसरात २०१२-१३ पासूनच घरगुती गॅसपुरवठा सुरू करण्यात आला होता. परंतु सुरुवातीला सानपाडय़ातून येणाऱ्या गॅसच्या वाहिनीच्या कामामध्ये तांत्रिक अडचण असल्याने आता ही वाहिनी सीवूड्स नेरुळ विभागाकडून येणाऱ्या गॅसवाहिनीला जोडून जुईनगर परिसरामध्ये आणण्यात आली आहे.

हे काम आपल्याच पक्षाच्या खासदारांनी पाठपुरावा केल्यामुळे झाल्याचा दावा शिवसेनेने केला आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादीनेही हे काम आपल्याच पक्षाच्या प्रयत्नांमुळे झाल्याचा दावा केला आहे. काही नागरिकांनी सुरुवातीला महानगर गॅस कंपनीकडे  ५०० रुपये अनामत भरली आहे. त्या ग्राहकांना ५ हजार ७५० रुपयांचा धनादेश घेऊन गॅस जोडणी देण्यात येत आहे. नव्याने गॅस जोडणीची मागणी करणाऱ्यांकडून ६ हजार ६३५ रुपयांचा धनादेश घेऊन तो वटल्यानंतरच महानगर कंपनीतर्फे गॅस जोडणी दिली जात आहे.

जुईनगर सेक्टर २४ मध्ये २ फेब्रुवारीला राष्ट्रवादीने महापौर व माजी खासदारांच्या उपस्थितीत या गॅसवाहिनीचे उद्घाटन करण्यात आले. तर शनिवारी शिवसेनेचे खासदार व मान्यवरांच्या उपस्थितीत गॅसपुरवठा सुरू करण्यात आला. त्यामुळे एकंदरीतच एकाच कामाचे दोन वेळा विविध पक्षांनी उद्घाटन केल्याने जुईनगर परिसरात आणि सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

खासदार राजन विचारे यांच्या पाठपुराव्यामुळेच हे काम पूर्णत्वास गेले आहे. परंतु प्रत्यक्ष घरांमध्ये गॅसलाइन येण्याआधीच अर्धवट कामाचे राष्ट्रवादीने महालक्ष्मी सोसायटीजवळ उद्घाटन केले होते.

– विशाल ससाणे, नगरसेवक, शिवसेना

हे काम राष्ट्रवादीच्या पाठपुराव्यामुळेच झाले आहे. २ फेब्रुवारीला महापौर व माजी खासदारांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते.  विरोधकांना  आम्ही उद्घाटन केल्यानंतर त्यांना जाग आली.

– विजय साळे, ब प्रभाग समिती सदस्य

आम्ही महानगर कंपनीतर्फे घरगुती गॅसवाहिनीचे काम केले आहे. ज्यांचे पैसे जमा झालेले आहेत, त्यांना गॅसपुरवठा करण्यात येत आहे. राजकीय पक्षांच्या वेगवेगळ्या उद्घाटनांचा कंपनीशी काही संबंध नाही.

– एस. आचार्य, अधिकारी, महानगर गॅस एजन्सी

First Published on February 14, 2018 3:25 am

Web Title: ncp shiv sena blame game over gas pipeline connection