X
X

चिक्की की न्याहारी?

गेली अनेक वर्षे पालिका विद्यार्थ्यांना शेंगदाणा अथवा राजगिरा चिक्की पोषण आहार म्हणून दिली जात होती.

पालिका शाळांतील पोषण आहारावरून राष्ट्रवादी, शिवसेनेत वादाची चिन्हे

नवी मुंबई पालिकेच्या बालवाडी ते आठवी पर्यंतच्या ३७ हजार शालेय विद्यार्थ्यांना पुरक पोषण आहारात चिक्की द्यावी की उपमा, शिरा, पोहे यासारखी सकस न्याहारी यावरून येत्या काळात रणकंदन माजण्याची चिन्हे आहेत. पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी  आणलेला इस्कॉनच्या सर्वसामावेशक अल्पोपहाराचा प्रस्ताव राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी फेटाळला असून शिवसेनेने त्याला विरोध केला आहे.

गेली अनेक वर्षे पालिका विद्यार्थ्यांना शेंगदाणा अथवा राजगिरा चिक्की पोषण आहार म्हणून दिली जात होती. ती खाऊन विद्यार्थी कंटाळले आहेत, असा मुद्दा आयुक्तांनी मांडला आहे. मुंबईत ही संस्था विद्यार्थ्यांना न्याहारी देत आहे.

नवी मुंबई पालिकेत यापूर्वी अतिक्रमण, मालमत्ता, उपकर यात अनेक घोटाळे झाले आहेत. इतर पालिका शाळांधील पटसंख्या घटत असताना नवी मुंबई पालिकेच्या शाळांधील विद्यार्थी संख्या दरवर्षी  वाढत आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पुरवठा करण्यात येणाऱ्या शालेय वस्तू, रेनकोट, मोजे यात घोटाळे झाले आहेत. बालवाडी ते आठवी या प्राथामिक शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या ३७ हजार ८५ आहे. येत्या वर्षांत या विद्यार्थ्यांना पुरक पोषण आहार म्हणून अन्नाम्रित फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने उपमा, शिरा, पोहे, दालिया, उसळ, गोड पदार्थ असा चौरस अल्पोपहार देण्यात यावा असा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला होता. तो सर्वसाधारण सभेपुढे मांडला होता. खारघर येथे असलेल्या या संस्थेच्या भोजनागृहातून हा अल्पोपहार संपूर्ण नवी मुंबई क्षेत्रातील दिवा ते दिवाळ्या पर्यंतच्या शाळेत पोहचविला जाणार आहे. वाहतूक खर्च वाढल्याने एका विद्यार्थ्यांसाठी १३ रुपये ९० पैसे खर्च येणार आहे. यापूर्वी देण्यात येणाऱ्या चिक्कीचा दर जवळपास सारखाच आहे. पुढील वर्षांतील वाढणारी पाच टक्के विद्यार्थी संख्या लक्षात घेता या सेवेवर दोन वर्षांत ३१ कोटी ४२ लाख रुपये खर्च होणार आहेत. गेली अनेक वर्षे चिक्की खाऊन कंटाळलेल्या विद्यार्थ्यांना पालिकेने सकस अल्पोपहार देण्याचा प्रस्ताव मांडला होता. तो सत्ताधारी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी फेटाळला आहे. त्यामुळे शिवसेना भाजपचे नगरसेवक संतापले आहेत. चौरस आहाराचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर आता पूर्वीच्याच चिक्कीचा प्रस्ताव मंजुरीसाठी दाखल केला जाणार असल्याने शिवसेनेने न्यायालयात दाद मागण्याची तयारी केली आहे.

उपमा, शिरा, पोहे या सारख्या सकस न्याहारीच्या ऐवजी शेंगदाणा आणि राजगिऱ्याची चिक्की सत्ताधारी पक्षाला इतकीच प्रिय आहे तर ही चिक्की राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना स्नेहभोजनात खाण्यास द्यावी. सत्ताधारी पक्षाने या चिक्कीच्या नावाने यापूर्वी बरेच चांगभले केले आहे. किमान विद्यार्थ्यांना तरी पौष्टिक आहार देताना ‘खाण्याची’ हौस कमी करावी. चिक्कीचा प्रस्ताव आल्यास आम्ही न्यायालयात दाद मागू.

– किशोर पाटकर, नगरसेवक, शिवसेना.

21
Just Now!
X