मनोमीलन मेळाव्यात आज आघाडीच्या घोषणेची शक्यता; शिवसेनेत मेगा भरती?

नवी मुंबई : यंदाच्या पालिका निवडणुकीत माजी मंत्री गणेश नाईक यांना ‘कात्रजचा घाट’ दाखविण्यासाठी राष्ट्रवादीने नवी मुंबईच्या पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी करण्याच्या दृष्टीने पावले टाकली आहेत. आज मनोमिलन मेळाव्यात या महाविकास आघाडीची औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे.

भाजपाला पुन्हा अच्छे दिन येतील अशी ‘खूणगाठ’ बांधून नाईकांबरोबर भाजपामध्ये गेलेल्या राष्ट्रवादीच्या ४९ नगरसेवकांपैकी काहीजण शिवसेनेत तर काही जण स्वगृही परतणार आहेत. महाविकास आघाडीचा प्रभाग वाटपाचा फॉम्र्युला ठरल्यानंतर हे पक्षांतर होणार असून यातील काही नगरसेवक मंगळवारी मेळाव्यात शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नवी मुंबई पालिकेच्या एप्रिल महिन्यात होणाऱ्या निवडणुकीच्या तयारीला आता सर्वच पक्ष लागले आहेत. शनिवारी प्रभाग आरक्षण झाल्यानंतर पालिका निवडणुकीचे प्रभागनिहाय चित्र स्पष्ट झाले आहे. या आरक्षणात अनेक प्रस्थापित नगरसेवकांना फटका बसला आहे. त्यामुळे गेली दोन महिने महाविकास आघाडीसाठी प्रयत्न करणाऱ्या स्थानिक व राज्य पातळीवरील नेत्यांनी प्रभाग वाटपाचा फॉम्र्युलाही ठरविला आहे.

शहरातील राजकीय सद्यस्थितीचा अभ्यास करून शिवसेनेला ‘मोठा भाऊ’ या नात्याने सर्वाधिक प्रभाग देण्याचा निर्णय झाला आहे. त्यासाठी राष्ट्रवादीने २५ पर्यंतच्या प्रभागावर तडजोड केल्याचे समजते. काँग्रेसकडे तर पालिका निवडणुकीत उभे राहण्यास सक्षम उमेदवार नसल्याने त्यांनी २० प्रभागांच्या आत समाधान मानले आहे. दोन्ही काँग्रेसने तडजोडोची तयारी दर्शवली आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या महाविकास आघाडीला जास्त महत्त्व दिले आहे. मागील १५ वर्षांच्या आघाडी सरकारच्या काळात पक्षाने ‘सर्व काही’ दिलेले असताना पक्षाच्या वाईट काळात साथ सोडणाऱ्या नेत्यांना धडा शिकविण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते तळ ठोकून राहणार आहेत. राज्यात यशस्वी होत असलेल्या महाविकास आघाडीच्या प्रयोगाला गालबोट लागू नये यासाठी नवी मुंबईतही हा प्रयोग करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचे नेते करीत आहेत. त्यासाठी मंगळवारी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जयंत पाटील, काँग्रेसचे अशोक चव्हाण, अभिजित कदम आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे एका व्यासपीठावर येत आहेत.

दहा ते बारा नगरसेवक शिवसेनेत?

शिवसेनेच्या मेगा भरतीला मंगळवारपासून सुरुवात होणार आहे. तुर्भे झोपडपट्टी भागातील औटघटकेचे ठरलेले चार भाजपा नगरसेवक शिवसेनेत जाणार आहेत तर ऐरोली विभागातील तीन नगरसेवकांनी शिवसेनेबरोबर घरोबा वाढविला आहे. त्यामुळे दहा ते बारा नगरसेवक हे शिवसेनेत तर चार नगरसेवक हे राष्ट्रवादीत पुन्हा परतणार आहेत. नाईकांबरोबर काँग्रेसच्या तीन नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यांना माघारी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे निवडणुकीपर्यंत भाजपामधील पंधरा ते वीस नगरसेवक हे पक्ष सोडून महाविकास आघाडीच्या घटक पक्षात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिवसेनेला ७१ प्रभाग?

प्रभाग आरक्षणानंतर राष्ट्रवादीने आपला अधिक प्रभागांचा दावा कमी केला आहे. निवडून येण्याची क्षमता असलेल्या कार्यकर्त्यांला उमेदवारी दिली जाणार असून राष्ट्रवादीच्या पदरात २३ तर काँग्रेसच्या वाटय़ाला १७ जागा येणार आहेत. महाविकास आघाडीत मोठा भाऊ ठरलेल्या शिवसेनेला ७१ प्रभाग मिळणार आहेत, बहुमतासाठी ५६ नगरसेवकांची गरज आहे. महाविकास आघाडी झाल्यास शिवसेनेची एकहाती सत्ता येण्याची शक्यता आहे.