नवी मुंबई पालिकेच्या नेरुळ येथील प्रभाग ८८ च्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार शिल्पा कांबळी विजयी झाल्या असून त्यांनी काँग्रेसच्या नूतन राऊत यांचा ७६ मतांनी निसटता पराभव केला. भाजपच्या सरस्वती पाटील या तिसऱ्या क्रमांकावर गेल्या.
ठाणे जिल्ह्य़ाचे आजी माजी पालकमंत्री एकनाथ शिंदे व गणेश नाईक आणि आमदार मंदा म्हात्रे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. यामुळे नाईक यांची नवी मुंबईवरील वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले.
कांबळी यांनी एक हजार ८१८ तर राऊत यांना एक हजार ७४२ मते मिळाली. युतीच्या उमेदवार सरस्वती पाटील यांना एक हजार २३ मते पडली.
चेंबूरमध्ये ४७.०८ टक्के मतदान
काँग्रेस नगरसेवकाने राजीनामा दिल्यामुळे चेंबूरमधील बोरला घाटला व्हिलेज प्रभागात रविवारी पोटनिवडणूक पार पडली. त्यात ४७.०८ टक्के मतदान झाले असून मतमोजणी सोमवारी होणार आहे. काँग्रेसचे अनिल पाटणकर यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला होता. या पोटनिवडणुकीत शिवसेनेने पाटणकर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे शिवसेना शाखाप्रमुख नागेश तवटे यांनी बंडखोरी केली होती.