नवी मुंबई राष्ट्रवादीला पडलेले खिंडार बुजविण्याची जबाबदारी टाकण्यात आलेले पक्षाचे सरचिटणीस उरणकर प्रशांत पाटील यांनी गुरुवारी आढावा बैठकी अगोदर बंडखोर माजी मंत्री गणेश नाईक यांना भेटण्यासाठी गेले होते. नाईक यांच्या बेलापूर येथील कार्यालयात पाटील यांनी संध्याकाळी दहा मिनिटे बंद दालनात चर्चा केली. पाटील हे नाईक यांचे रायगड जिल्ह्य़ातील निष्ठावंत कार्यकर्ते मानले जात होते पण त्यांनी नाईकांबरोबर फरफटत न जाता राष्ट्रवादीतच राहण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यांनी नाईकांबरोबर केलेली गुप्त चर्चा अनेकांच्या भुवया उंचावणारी आहे. ही बैठक झाल्यानंतर पाटील यांनी नेरुळ येथील आढावा बैठकीत नाईक पुत्रांवर तोंडसुख घेतले.

राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री गणेश नाईक यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. नाईक यांच्या विरोधात उभे राहण्यासाठी आगरी समाजाचे उरणचे प्रशांत पाटील यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. नवी मुंबईतील बंडखोरी थोपविण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे. नाईक यांच्याच मुशीत तयार झालेल्या पाटील यांचे नवी मुंबईतील अनेक नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी यांच्या बरोबर सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे पक्षाच्या जास्तीत जास्त नगरसेवकांनी कायम राहावे यासाठी ते प्रयत्नशील आहेत. नाईकांशी दोन हात करण्यासाठी मैदानात उतरविण्यात आलेल्या राजकीय पहेलवाने गुरुवारी संध्याकाळी नाईक यांच्या बेलापूर येथील ग्रीनहाऊस समोरील इमारतीतील कार्यालयात संर्पक साधून चर्चा केली. पूर्वाश्रमीचे गुरु-शिष्यात काय चर्चा झाली हे कळू शकलेले नाही, पण पक्षाने माझ्यावर ही जबाबदारी टाकली असून आपण तुम्हाला सोडून तुमच्या मुलांवर टीका करणार असल्याचे सांगून नाईकांशी ऋणानुबंध कायम राहतील याची तजवीज केली असल्याचे समजते. दरम्यान नाईक भेटीनंतर नेरुळ येथील डी. वाय. पाटील सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत पाटील यांनी नाईक यांचे माजी खासदार पुत्र संजीव नाईक यांच्या मोबाइल डिप्लोमसी व माजी आमदार संदीप नाईक यांच्या ऐटबाजीवर टीका केली. मुंबईत पवार यांच्या समोर नाईकांवर टीकास्त्र सोडणारे पाटील यांनी या आढावा बैठकीत आपण किती काळ नाईकांबरोबर होतो याचे दाखले दिले.