संतोष सावंत

पनवेल पालिका क्षेत्रात शुक्रवारी सुधागड महाविद्यालयातील विद्यार्थी आत्महत्येचा प्रयत्नानंतर पालकांनाही याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. चार वर्षांमध्ये अशा चार घटना पनवेलमध्ये घडल्या आहेत. शिक्षणाचे माहेरघर बनत असणाऱ्या पनवेलमध्ये विद्यार्थी टोकाचा निर्णय का घेतात, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. याबाबत मनोविकारतज्ज्ञ डॉ. प्रदीप पाटकर यांनी विद्यार्थी आत्महत्येची कृत्ये ही आवेगातून केलेली वटत असली तरी ती नियोजित असतात. मनाविरुद्ध घटना घडल्यानंतर मुलांमध्ये नैराश्याची भावना तीव्रतेने वाढत आहे, या बाबत चिंता व्यक्त करीत याबाबत पालक शिक्षकांचेही समुपदेशनही करणे गरजेचे असल्याचे सांगितले.

शिवमच्या घटनेत रात्री पालकांसोबत घरात झालेल्या नकारात्मक संवादामुळे रात्रभर त्याच्यामध्ये आलेल्या नैराशेच्या प्रभावातून हे कृत्य केले गेले असावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

रायगड जिल्ह्य़ातील सर्वाधिक ८० टक्के शिक्षण संस्था पनवेल पालिका क्षेत्रात आहेत. त्यामुळे विविध जिल्ह्य़ांतून, देशभरातून येथे मुलांच्या शिक्षणासाठी पालक स्थलांतरित होत आहेत. मात्र पाल्यांच्या आत्महत्येच्या टोकाच्या निर्णयाचा शोध अद्याप कोणतीही सरकारी व सामाजिक यंत्रणा लावू शकली नाही.

फेब्रुवारी महिन्यात खांदेश्वर वसाहतीमधील न्यू होरायझन विद्यालयातील गौरव कंक या विद्यार्थ्यांच्या मृत्यूची घटना घडली होती. तर याच वर्षी जुलै महिन्यात कळंबोली येथील सेंट जोसेफ विद्यालयात विघ्नेश साळुंके याही विद्यार्थ्यांने आत्महत्या केली होती. २०१६ या वर्षी जुलै महिन्यात कळंबोलीतील पुष्पा सूर्यवंशी हिला सुधागड महाविद्यालयात अकरावीला प्रवेश न मिळाल्याने तिनेही आत्महत्याचा मार्ग निवडला होता. त्यानंतर शुक्रवारी वडील दुचाकी देणार नाहीत याच गैरसमजेतून शिवमनेही स्वत:ला वेदना देत आत्महत्येचा मार्ग निवडला. शिवमची प्रकृती अजूनही अस्थिर आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दुचाकी व्यवस्थित चालवण्यासाठी त्याच्या वडिलांनी दुचाकी विक्रीचा धाक दाखविल्याने या क्षुल्लक कारणावरून शिवमने हा मार्ग निवडला. मात्र, ही घटना शिवमच्या वडिलांनी ऐकल्यावर ते जाग्यावर कोसळले. विघ्नेश साळुंके याच्या प्रकरणातही विघ्नेश त्या दिवशी विद्यालयाच्या सहाव्या मजल्यावर कोणत्या कारणावरून गेला त्याने वरून का उडी मारली याचा शोध चार वर्षांनंतरही पोलीस लावू शकले नाहीत.

या वाढत्या घटनांबाबत मनोविकारतज्ज्ञही चिंता व्यक्त करू लागले आहेत. डॉ. प्रदीप पाटकर यांनी, सध्या मुलांमध्ये तुलनात्मक आभाव वाढताना दिसतो आहे. जी गोष्ट इतरांकडे आहे व माझ्याकडे नाही, त्या गोष्टीचा आभाव मुलांमध्ये नैराश्य येण्यास कारणीभूत ठरत आहे. पालकांबद्दल संताप असून कृतघ्नता दिसून येते. कृतज्ञता संपुष्टात आलेली दिसते. तसेच अधिकाराची भावना वाढलेली आहे. मी, माझं, मला यापलीकडे मला पाहायचंच नाही, मला हवं असलेलं पालकांनी दिलंच पाहिजे, असा विचार वाढत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

शिक्षक, पालकांचे समुपदेशनही महत्त्वाचे

हल्ली सर्व शाळा महाविद्यालयांत समुपदेशक असतात, परंतु तेथील फक्त विद्यार्थ्यांचेच नव्हे तर शिक्षक व पालाकांचेही समुपदेशन व्हायला हवे. शाळाशाळामधून याविषयी चर्चा व मार्गदर्शन सत्रे व्हायला हवीत, यामध्ये मुलांमध्ये वाढणारे वैफल्य, संताप, निराशा, आक्रमकपणा, अभ्यासाचा ताण, स्मार्ट फोनचा अतिवापर व त्याचे दुष्परिणाम, समाज माध्यमांमुळे सतत मिळणारे क्रोध व उताविळपणाचे धडे याविषयी चर्चा होणे गरजेचे असल्याचे डॉ. प्रदीप पाटकर यांनी सांगितले.