उरणमध्ये वाहनचालकांसमोर खड्डय़ांचे विघ्न कायम

उरण : करोनाचा कहर सुरूच असल्याने अनेक कामे बंद पडलेली होती, मात्र पावसाला सुरुवात झाल्यानंतर अनेक विकासकामे सुरू झाली असून उरणमधील कामे सुरू असताना येथील मुख्य तसेच गावांना जोडणाऱ्या रस्त्यांत मोठे खड्डे पडलेले आहेत. रस्ते बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारावर दुरुस्तीचीही जबाबदारी टाकली आल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केला जात आहे. मात्र, पावसाळ्यापूर्वी पडलेले खड्डेच न बुजविल्याने खड्डय़ांची संख्या वाढत असल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.

उरणमध्ये सिडको, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जेएनपीटी या तीनही आस्थापनांकडून रस्तेदुरुस्ती तसेच नवीन रस्ते तयार करण्याची कामे केली जातात. यात पूर्वी कंत्राटदाराला वारंवार रस्त्याच्या दुरुस्तीची कामे दिली जात होती; परंतु सध्या ज्या कंत्राटदाराला रस्ता तयार किंवा दुरुस्तीचे काम दिले जात आहे त्याच्याकडेच त्या रस्त्याच्या दुरुस्तीचीही जबाबदारी टाकण्यात आली आहे. किमान दोन वर्षे, तर काही ठिकाणी पाच वर्षांचीही ही मुदत असली तरी कंत्राटदाराचे कामाची देयके देऊन झाली की, कंत्राटदार या रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष देत नसल्याचे मत उरणमधील सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र म्हात्रे यांनी दिले आहे. उरणमधील उरण ते करळ, शहरातील रस्ते तसेच द्रोणागिरी नोड, नवघर ते चिरनेर आदी विभागांतील मार्गावर खड्डे पडलेले आहेत. यातील कळंबुसरे येथील रस्ता तर खड्डय़ांचाच बनला आहे. या मार्गावरून छोटी वाहने बंद करण्यात आली आहेत.