रस्ते वाहतुकीला पर्याय म्हणून जलवाहतुकीवर शासनाने भर दिला असून नेरुळ ते भाऊचा धक्का जलप्रवास दृष्टिक्षेपात आला आहे. नेरुळ जेट्टीचे निम्मे काम पूर्ण झाले असून मार्च २०२० पर्यंत जलप्रवासासाठी जेट्टी तयार असेल असा विश्वास सिडकोने दाखविला आहे. त्यामुळे पुढील वर्षांत नवी मुंबई ते मुंबई हा प्रवास फक्त ३० मिनिटांत  शक्य होणार आहे.

खासदार राजन विचारे यांनी नेरुळ जेट्टीच्या कामाची पाहणी केली. त्यावेळी सिडको अधिकाऱ्यांनी ५० टक्के काम पूर्ण झाल्याचे सांगितले. सिडकोचे अतिरिक्त मुख्य अभियंता के.एम.गोडबोले, अधीक्षक अभियंता चांडेल मकसूद तसेच महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे अधिकारीही यावेळी उपस्थित होते.

या प्रकल्पासाठी सिडकोने १११ कोटींची तरतूद केली आहे. हा प्रकल्प दोन भागात असून जमिनीवरील भागावर ६५० बाय ३० मीटरचा रस्ता बनविण्यात येणार आहे. तसेच पाण्यामध्ये ४०० बाय २० मीटरचा भाग असून ८० बाय ५५ मीटरच्या जागेवर पार्किंगची व्यवस्था असणार आहे. यात २५ मोटार, ११ बस उभ्या राहू शकतील. या ठिकाणी टर्मिनल उभारण्यात येत असून त्यात प्रवाशांसाठी प्रतीक्षाकक्ष, तिकीट खिडकी, फूड कोर्ट इत्यादीचा समावेश असणार आहे.

या प्रकल्पाचे काम जलद गतीने मार्गी लावण्यात यावे, असे सिडकोचे मुख्य अभियंता केशव वरखेडकर यांना खासदारांनी सांगितले.

आठ ठिकाणी जेट्टी

ठाणे ते नवी मुंबई या मार्गावर आठ ठिकाणी जेट्टी बांधण्यात येणार आहेत. त्यामध्ये वाशी, नेरुळ, बेलापूर, तळोजा, जुईगाव, पनवेल, जेएनपीटी आणि मोरा असा प्रस्ताव आहे. याला २४ ऑक्टोबर २०१८ रोजी मंजुरी मिळाली आहे.