मलनिस्सारण केंद्र बंद करण्याची प्रक्रिया सुरू

मलनिस्सारण प्रकल्पातून येणाऱ्या दरुगधीमुळे नेरुळवासीयांची वर्षांनुवर्षे होत असलेली घुसमट आता थांबणार आहे. वन विभागाच्या देखरेखीखाली हा प्रकल्प बंद करून तेथील मलनिस्सारण वाहिन्या सानपाडा सेक्टर २० मधील नव्या एसटीपी केंद्राकडे वळवण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यामुळे केंद्र बंद करण्याचे काम सुरू झाले आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सानपाडा केंद्राच्या परिसराची पाहणी केली.

नवी मुंबई महापालिकेला भारत सरकारच्या नगरविकास मंत्रालयाकडून जेएनएनयूआरएमअंतर्गत २००८-२००९मध्ये ‘बेस्ट सिटी फॉर इम्प्रुव्हमेंट इन वेस्ट वॉटर अ‍ॅण्ड सॅनिटेशन सव्‍‌र्हिसेस’ हा पुरस्कार  देण्यात आला होता. शहरातील ८५ टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी नवी मुंबई ही राज्यातील एकमेव महापालिका आहे. नवी मुंबई महापालिकेने केंद्र शासनाच्या जेएनएनयूआरएमअंतर्गत शहरात बेलापूर, नेरुळ, सानपाडा, वाशी, कोपरखैरणे, ऐरोली येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित मलप्रक्रिया केंद्रे सुरू केली आहेत. परंतु नेरुळ येथील सेक्टर दोनमधील जुन्या तंत्रज्ञानावर आधारित सिडकोकालीन मलप्रक्रिया केंद्र बंद करून येथील सर्व काम सानपाडा सेक्टर २० येथील नव्या एसटीपी केंद्रात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मलनिस्सारण वाहिन्या टाकण्यात खारफुटी आणि अन्यही काही अडथळे होते. त्यामुळे पाच वर्षांपासून हे काम रखडले होते. पालिकेने ‘मुंबई कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी’चीही येथील कामासाठी परवानगी घेतली होती. आता वनविभागाच्या निर्देशाखाली काम करण्याची परवानगी मिळाल्याने येथील कामाला सुरुवात झाली आहे.

सानपाडा सेक्टर २० येथे पालिकेने नव्या तंत्रज्ञानावर आधारित एसटीपी केंद्र २०१२लाच उभारले. नेरुळ गाव, कुकशेत,सारसोळे, नेरुळ सेक्टर २, ३, ४, ६, ८, १०, ११, १२, १४, १६, १६ ए, १८, १८ ए, २०, २४  भागांतून येणाऱ्या सांडपाण्यावर नेरुळ येथी जुन्या केंद्रात प्रक्रिया केली जात असे. आता त्या केंद्रातील सर्व वाहिन्या सानपाडा येथील नवीन केंद्राला जोडल्या जाणार आहेत.

नेरुळ येथील केंद्र जुन्या तंत्रज्ञानावर आधारित असल्यामुळे तिथे केवळ प्राथमिक प्रक्रिया केल्या जात. परिणामी परिसरातील रहिवाशांना दरुगधीचा सामना करावा लागत असे. त्याचा परिणाम रहिवाशांच्या आरोग्यावरही होत असे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि रहिवाशांनी याबाबत पालिकेकडे तक्रारी केल्या होत्या. परिसरात सकाळी व संध्याकाळी मोठय़ा प्रमाणात वास येतो. डासांचे आणि रोगांचेही प्रमाणा अधिक आहे. केंद्रातील प्रक्रिया करण्यासाठीचा पंप बिघडला आहे. पाण्यावर पूर्णपणे प्रक्रिया न झाल्याने दरुगधीयुक्त वायू परिसरात पसरतो. आता केंद्र बंद होणार असल्यामुळे रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. वाहिन्या सानपाडय़ातील केंद्राला जोडण्यासाठी एक कोटी ६० लाख रुपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे नेरुळवासीयांची दरुगधीतून सुटका होणार आहे.

नेरुळ सेक्टर २ येथील मलनिस्सारण केंद्र लवकरच बंद करण्यात येणार आहे. सानपाडा केंद्राशी या विभागातील मलवाहिन्या जोडण्याचे काम पूर्ण होताच नेरुळ येथील जुने एसटीपी केंद्र बंद करण्यात येईल.

मोहन डगावकर, शहर अभियंता

नेरुळ सेक्टर दोन येथे जुने मलप्रक्रिया केंद्र आहे. त्यामुळे परिसरात दरुगधी पसरते. याविषयी नागरिक नेहमी तक्रारी करतात. हे केंद्र बंद करून तेथील सांडपाणी सानपाडा येथील केंद्रावर वळविण्यात येणार असल्याने हजारो रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न सुटणार आहे. नेरुळ येथील जुने केंद्र बंद झाल्यावर त्या जागेवर क्रीडा संकुल बांधण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

रंगनाथ औटी, स्थानिक नगरसेवक

नेरुळ सेक्टर दोन येथे मलनिस्सारण केंद्रातून प्रचंड दरुगधी येते त्यामुळे विभागातील रहिवासी वारंवार आजारी पडतात. केंद्रातील काही पंप बंद पडले की दूषित वायू हवेत वर मिसळतात. त्यमुळे अधिकच दरुगधी पसरते. नाक मुठीत धरून राहावे लागते. हे केंद्र पालिकेने तात्काळ बंद करावे. सानपाडा येथील केंद्राशी जोडण्याचे काम लवकर झाल्यास आमचे जगणे सुसह्य़ होईल.

तुकाराम काळे, सविनय सोसायटी, नेरुळ सेक्टर २