05 March 2021

News Flash

नेरुळच्या वाचनालयात श्वानांचे बस्तान

नेरुळ सेक्टर ३ येथील जनता मार्केटच्या लगत ज्येष्ठ नागरिक वाचनालय आहे.

नेरुळच्या सेक्टर ३ येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी साकारलेल्या वाचनालयाची दुरवस्था; वाचनालयात कुत्र्यांनी घेतलेला आश्रय

दुरवस्थेमुळे उंदीर, घुशींचा वावर; आयुक्तांनी समस्येकडे गांभीर्याने पहाण्याची मागणी

नागरिकांच्या कररूपी पैशातून नेरुळच्या सेक्टर ३ येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी साकारण्यात आलेल्या वाचनालयाची दुरवस्था झाल्याने येथे भटक्या कुत्र्यांनी आश्रय घेतला आहे. त्यामुळे वाचन संस्कृती रुजावी, म्हणून प्रयत्नशील असणाऱ्या पालिकेच्या या वाचनालयात पुस्तकांऐवजी उंदीर, घुशींचा वावर अधिक पाहावयास मिळत आहे. म्हणूनच या समस्येकडे पालिकेने गांभीर्याने लक्ष घालावे, अशी मागणी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांकडून केली जात आहे.

नेरुळ सेक्टर ३ येथील जनता मार्केटच्या लगत ज्येष्ठ नागरिक वाचनालय आहे. नगरसेवक निधीतून हे वाचनालय उभारण्यात आले आहे. शिवाय लाखो रुपये खर्च करून आसनव्यवस्था देखील करण्यात आली आहे. मात्र प्रशस्त अशा या वाचनालयाचे लोखंडी प्रवेशद्वार तुटल्यामुळे येथे मोकाट कुत्र्यांनी आश्रय घेतल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. तर आतील फरशीचा संपूर्ण भाग हा घुशी व उंदरांनी पोखरल्याने मातीचे ढिगारे दिसत आहेत. त्याचबरोबर ज्येष्ठांसाठी बसविलेल्या आसनांखालीच कुत्र्यांनी निवाराघर तयार केले असून वाचनालयात जातानाच या कुत्र्यांची दहशत पाहायला मिळते.

पालिकेचा दुटप्पीपणा

शहरातील ज्येष्ठ नागरिकांचे जीवन सुखमय व्हावे व त्यांच्या प्रति आदराची भावना निर्माण होण्यासाठी पालिकेने शहरात ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रे उभारली आहेत. तर नगरसेवक निधीतून लाखो रुपये खर्च करून वाचनालये देखील तयार करण्यात आली आहेत. परंतु पालिकेच्या दुर्लक्षामुळे या वास्तूंची दुरवस्था झाली आहे. तर दुसरीकडे नागरिकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, यासाठी पालिकाक्षेत्रात ११ ग्रंथालये आहेत. या ठिकाणी हजारो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचेही ज्ञान घेतात. परंतु शहरातील ज्येष्ठांसाठी व नागरिकांसाठी बनविण्यात आलेली वाचनालये मात्र दुरवस्थेच्या गर्तेत सापडल्याचेच चित्र आहे.

नेरुळ सेक्टर ३ येथील ज्येष्ठ नागरिकांच्या वाचनालयाची अत्यंत दुरवस्था आहे. यासाठी पालिकेकडे लेखी पत्रव्यवहार केल्यानंतर दुरुस्तीबाबत फाइलही तयार करण्यात आली आहे. मात्र जे काम करायचे आहे, त्या ठिकाणी आयुक्त प्रत्यक्ष भेट देत असल्याने त्याच्या दुरुस्तीसाठी उशीर होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आयुक्तांनी जर या वाचनालयांसाठी वेळ दिला नाही. तर ही दुरवस्था अशीच ठेवायची का? असा प्रश्न पडत आहे.

शिल्पा कांबळी, सभापती, महिला व बालकल्याण समिती.

नेरुळ सेक्टर ३ येथील ज्येष्ठ नागरिकांच्या वाचनालयाच्या दुरवस्थेबाबत लवकरच योग्य तो निर्णय घेण्यात येईल. यासंबंधी तातडीने काम करण्याबाबत संबंधित विभागाला कळविण्यात येईल.

दादासाहेब चाबुकस्वार, उपायुक्त, परिमंडळ -१.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2017 1:23 am

Web Title: nerul library condition
Next Stories
1 शहरबात- उरण : नियोजनटंचाईच्या झळा
2 कुटुंबसंकुल : नव्या-जुन्याची सांगड
3 ४८ टन निर्माल्य जमा
Just Now!
X