जमिनीचा प्रश्न निकालात काढून सप्टेंबर २०१९ पर्यंत सेवा देण्याचा प्रयत्न

नेरूळ-खारकोपर लोकलसेवेच्या उद्घाटनप्रसंगी वर्षभरात उरणपर्यंत ही सेवा सुरू होणार असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केल्यानंतर सिडको प्रशासन कामाला लागले आहे. खारकोपरपासून उरणपर्यंतच्या १५ किमी मार्गातील भूसंपादनाचा अडथळा दूर करून सप्टेंबर २०१९पर्यंत ही सेवा सुरू होईल असा विश्वास सिडकोकडून व्यक्त होत आहे. तसे नियोजन करण्यात येत आहे.

खारकोपरपासून उरणपर्यंतच्या १५ किलोमीटर मार्गासाठी भूसंपादनाबाबत अडचणी आहेत. त्यात खासगी १४ हेक्टर जमिनीचा तर ४ हेक्टर वनविभागाच्या जमिनीचा अडथळा होता. त्यातील वनविभागाच्या जमिनीचा प्रश्न काही अंशी मार्गी लागला आहे. खासगी १४ हेक्टर जमिनीचा प्रश्नही निकालात काढण्यासाठी सिडको प्रयत्न करीत आहे. ०.६ हेक्टर जमिनीबाबत लवकरच तोडगा निघणार आहे.

नेरूळ-उरण रेल्वेमार्गावर नेरूळ, सीवूड, दारावे, सागरसंगम, तरघर,बामणडोंगरी, खारकोपर, गव्हाण, रांजणपाडा, न्हावाशेवा, द्रोणागिरी आणि उरण ही रेल्वेस्थानके आहेत. खारकोपपर्यंत काम झाले असून त्यापुढील गव्हाण, रांजणपाडा, न्हावाशेवा, द्रोणागिरी व उरण या स्थानकांचे काम बाकी आहे.

हा दुसरा टप्पाही वेगाने पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. मुख्यमंत्र्यांनी डिसेंबपर्यंतची मुदत दिली आहे. परंतु या मार्गावर सप्टेंबर २०१९ पर्यंत रेल्वे सुरू करण्यासाठी नियोजन करण्यात येत असून हालचाली सुरू असल्याचे सिडको अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी सांगितले.

पुढील मार्गासाठी जमीन संपादनाबाबत काही प्रश्न आहेत. खारकोपरनंतर पुढील टप्प्यातील कामावर रेल्वेचे नियंत्रण असून त्यात सिडकोची ६७ टक्के भागीदारी आहे. त्यामुळे आता जमिनीचा प्रश्न निकालात निघाल्यानंतर येथील कामाला वेग येणार आहे.     – एस. के. चौटालिया, मुख्य अभियंता, सिडको रेल्वे प्रकल्प

नेरूळ-उरण रेल्वेमार्ग

  • प्रकल्पाचा खर्च १७८२ कोटी
  • सिडकोचा ६७ टक्के तर रेल्वेचा ३३ टक्के भागीदारी
  • नेरूळ उरण मार्गावर एकूण १० स्थानके