25 April 2019

News Flash

नेरुळ-उरण रेल्वेचा मुहूर्त टळणार?

सीवूड्स ते खारकोपरदरम्यानच्या पहिल्या टप्प्याचे काम मंदगतीने

बामणडोंगरी स्थानकाचे काम अद्यापही प्राथमिक स्वरुपात आहे.

सीवूड्स ते खारकोपरदरम्यानच्या पहिल्या टप्प्याचे काम मंदगतीने

सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी सीवूड्स ते खारकोपरदरम्यानचा मार्ग डिसेंबर २०१७ पर्यंत सुरू करण्याचे सूतोवाच केले होते; परंतु या मार्गावरील कामांची मंदगती पाहता रेल्वे सुरू होण्याची मार्च २०१८ची मुदत टळून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या आठ किलोमीटरच्या मार्गावर नेरुळ, सीवूड दारावे, सागरसंगम, तरघर, बामणडोंगरी आणि खारकोपर अशी स्थानके आहेत. यातील सागरसंगम स्थानक प्रस्तावित आहे; परंतु पहिल्या टप्प्यातील कामात स्थानकाभोवताली खारफुटीचा भाग आणि जवळपास लोकवस्ती मोठय़ा प्रमाणात नसल्याने सागरसंगम स्थानक उभारले जाणार नाही.

सिडकोच्या वतीने ६७ टक्के तर रेल्वेच्या वतीने ३३ टक्के कामे नेरुळ रेल्वेस्थानकांदरम्यान होणार आहेत. यात अंतर्गत कामांचा समावेश आहे. बामणडोगरीपर्यंत रूळ टाकण्याचे काम सुरू आहे. याशिवाय विशेष रेल्वे लिंकिंकचे काम सुरू झाले आहे. सुरुवातीला चाचणीसाठी रूळ टाकण्यात आला होता. त्या ठिकाणी आता कायमस्वरूपी रूळ टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

शिवडी न्हावा-शेवा सागरी मार्ग तसेच नेरुळ-उरण प्रकल्प, आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे उलवे नोड  गुंतवणुकीचे सर्वात मोठे आर्थिक केंद्र बनत असून उलवे भागात मोठमोठे गृहनिर्माण प्रकल्प उभे राहत आहे.

नेरुळ-खारकोपर या पहिल्या टप्प्यातील रेल्वे लवकरात लवकर सुरू होण्याची वाट पाहत आहोत. उलवे भागात मोठे प्रकल्प उभे राहत आहेत. रेल्वे सुरू झाल्यास येथील गृहबांधणी प्रकल्पाला पुन्हा जोमाने सुरुवात होईल.    – सुहास नांदोडकर, व्ही. जी डेव्हलपर्स

नेरुळ खारकोपरच्या पहिल्या टप्प्यात स्थानकउभारणीची कामे वेगाने सुरू आहेत. नेरुळ, सीवूड्स, बामणडोंगरी, खारकोपर स्थानकांच्या उभारणीची कामे मार्चपर्यंत पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. रेल्वेही वेगाने कामाला लागली आहे.    – एस. के. चौटालिया मुख्य अभियंता, सिडको रेल्वे प्रकल्प

First Published on December 27, 2017 1:54 am

Web Title: nerul uran railway project work stop