21 April 2019

News Flash

नेरुळचे विज्ञान केंद्र रखडले

अल्पावधीतच शैक्षणिक पंढरी म्हणून उदयाला आलेल्या नवी मुंबईत एखादे अद्ययावत विज्ञान केंद्र असावे, असा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे

(संग्रहित छायाचित्र)

वाढीव चटईक्षेत्र निर्देशांक मिळेना; विलंबामुळे प्रकल्प आचारसंहितेत अडकण्याची शक्यता

सिमेंटचे जंगल म्हणून तयार झालेली ओळख पुसून अत्याधुनिक ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नवी मुंबई पालिकेला सिडकोच्या लाल फितीच्या कारभाराचा चांगलाच फटका बसला आहे. नेरुळ येथील वंडर पार्कच्या दहा हेक्टर जमिनीला वाढीव चटईक्षेत्र निर्देशांक देण्याची मागणी गेली पाच महिने मंजूर न झाल्याने पालिकेचा अद्ययावत विज्ञान केंद्र प्रकल्प रखडण्याची चिन्हे आहेत.

अल्पावधीतच शैक्षणिक पंढरी म्हणून उदयाला आलेल्या नवी मुंबईत एखादे अद्ययावत विज्ञान केंद्र असावे, असा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी त्यासाठी आग्रही आहेत. कोणत्याही प्रकल्पासाठी सिडकोकडून जमीन पदरात पाडून घेणे म्हणजे एक दिव्य होऊन बसले आहे. मागील दहा वर्षांच्या पाठपुराव्यानंतर आता शिरवणे येथे कत्तलखान्यासाठी सिडकोने २१ एकरचा भूखंड देऊ केला आहे. जमीन विक्रीवरच सिडकोचा डोलारा असल्याने मोक्याचे सहजासहजी भूखंड सिडको पालिकेला देत नाही. त्यामुळे विज्ञान केंद्रासाठी वेगळ्या भूखंडाची मागणी न करता पालिकेने नेरुळ सेक्टर १९ अ येथील वंडर पार्कजवळील ५९९७ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडाची मागणी केली आहे. विज्ञान केंद्रासाठी कमीत कमी पाच एकर जमीन लागणार असल्याने पालिकेने या जमिनीवर दीड वाढीव चटई निर्देशांक मागितला आहे. त्यामुळे जमिनीचे कमी क्षेत्रफळ असले तरी एफएसआयमुळे पालिकेला उंच इमारत बांधून विज्ञान केंद्र व एका आगळ्यावेगळ्या वस्तुसंग्रहालाची उभारणी करता येणार आहे. या भागात आता वंडर पार्क आणि भविष्यात निर्माण होणाऱ्या विज्ञान केंद्रामुळे वाहनतळाची नितांत आवश्यकता लक्षात घेता पालिकेने याच क्षेत्रातील १३०० चौरस मीटरचा भूखंड वाहनतळासाठी मागितला आहे. पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी आणि सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांची याबाबतीत जूनमध्ये एक संयुक्त बैठक झाली. त्या वेळी सिडकोच्या अखत्यारीत असलेला वाढीव एफएसआय देण्यास कोणतीही हरकत नसल्याचा अभिप्राय सिडको अधिकाऱ्यांनी दिला. त्यामुळे पालिकेने मिळणाऱ्या वाढीव एफएसआयला गृहीत धरून या विज्ञान केंद्राचा व वस्तुसंग्रहालयाचा आराखडा तयार केला आहे. शहराची एक वेगळी ओळख तयार करण्यासाठी धडपडणाऱ्या पालिकेला मात्र सिडकोच्या लाल फितीतील कारभाराचा चांगलाच फटका बसला आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालकांनी जूनमध्ये निर्देश दिल्यानंतरही प्रशासनाने अद्याप या वाढीव चटई निर्देशांकाला संचालक मंडळाची मंजुरी घेण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आलेला नाही. सर्व सोपस्कार पूर्ण करून हा प्रस्ताव लवकर मंजूर व्हावा यासाठी पालिका आयुक्त प्रयत्नशील आहेत; पण त्याला सिडकोचे अधिकारी दाद लागून देत नसल्याचे दिसून येते.

मोक्याच्या जागी असलेले हे भूखंड विकून गडगंज पैसा उभा करता येईल, असा सिडकोच्या अर्थशास्त्र विभागाचा अभिप्राय आहे. पालिकेला वाढीव एफएसआय मिळाला तर विज्ञान केंद्राच्या कामाला सुरुवात होणार आहे. या प्रस्तावाला विलंब लागल्यास तो आगामी निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विज्ञान- तंत्रज्ञानाची सांगड

विज्ञान आणि तंत्रज्ञानाची सांगड घालणारा हा प्रकल्प असून, यात असणाऱ्या तारामंडळामध्ये तारे व पृथ्वी यांचे महत्त्व सांगितले जाणार आहे. याशिवाय ‘थ्री’डी शोची व्यवस्थाही केली

जाणार आहे. विविध शोधांची माहिती दिली जाणार असून कार्यशाळाही घेतल्या जाणार आहेत. ऑटोमोबाईल हबचे स्वतंत्र दालन या ठिकाणी असेल. माहितीजालावर आधारीत हे विज्ञान केंद्र उभारण्याचा नवी मुंबई महापालिकेचा प्रयत्न आहे.

नवी मुंबई पालिकेने नेरुळ येथे एक अद्ययावत विज्ञान केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज्यातील काही विज्ञान केंद्रांची पाहणीदेखील करण्यात आलेली आहे. नवी मुंबईला आयटी क्षेत्राचा चेहरा आहे. ती संकल्पना लक्षात घेऊन हे विज्ञान केंद्र उभारले जाणार आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे.

– डॉ. रामास्वामी, एन. आयुक्त, नवी मुंबई पालिका

First Published on November 2, 2018 3:15 am

Web Title: neruls science center rattled