नेरुळमध्ये रस्त्यांवर खड्डे खोदून, खांब रोवून अडवणूक

वाढती वाहनसंख्या आणि त्या तुलनेत नगण्य असलेली वाहनतळे, अपुरी पार्किंग सुविधा याचे तीव्र दुष्परिणाम शहरात ठिकठिकाणी दिसू लागले आहेत. आजवर रस्त्याकडेला बेकायदा पार्किंग करणारे वाहनधारक आता रस्त्यावर खड्डे खोदून दोरी बांधून जागा अडवून ठेवू लागले आहेत. नेरुळ सेक्टर-२मध्ये हे दृश्य ठिकठिकाणी दिसत आहे.

नवी मुंबईत बेकायदा पार्किंगची आणि परिणामी वाहतूक कोंडीची समस्या दिवसागणिक गंभीर होत आहे. तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या आयुक्तपदाच्या कार्यकाळात रहिवाशांनी सोसायटीच्या आवारातच वाहने पार्क करावीत, असे स्पष्ट निर्देश दिले होते. रस्त्यावर बराच काळ एकाच ठिकाणी उभी केलेली वाहने उचलून पालिकेच्या कचराभूमीवर टाकली होती. पार्किंगसाठी जागा उपलब्ध नसल्यास वाहने खरेदी करू नयेत, सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर करावा, असे आवाहनही मुंढे यांनी केले होते; परंतु तरीही शहरात सर्वत्र मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांच्या दुतर्फा वाहने पार्क केली जात आहेत.

नेरुळ, वाशी, बेलापूरसह शहरातील अंतर्गत रस्त्यांवर बेकायदा पार्किंगचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. नेरुळ सेक्टर २मध्ये सिडकोच्या वसाहतींची संख्या मोठी आहे. याच परिसरात उच्च दाबाच्या वीजवाहिन्या आणि त्याखाली रोपवाटिका आहेत. त्या बाजूला रस्त्यावर खड्डे खोदून कुठे लाकडी खांब, तर कुठे लोखंडी सळ्या रोवण्यात आल्या आहेत. आपले वाहन उभे करता येईल, एवढी जागा दोन खांबांमध्ये ठेवून ते खांब दोरीने किंवा प्लास्टिकच्या पट्टीने बांधण्यात आले आहेत. आपल्या मालकीचीच जागा असल्याप्रमाणे वाहनधारक या ठिकाणी रोज वाहन उभे करतात. वाहन बाहेर काढल्यानंतर पुन्हा दोरी बांधून ठेवतात. आपल्या नेहमीच्या जागेवर कोणीही वाहन उभे करू नये, म्हणून ही अडवणूक केली जात आहे. शहरस्वच्छतेत या बेकायदा पार्किंगचा अडथळा येत आहे. मुंबई, ठाणे, पनवेल परिसरात कामाला जाणाऱ्यांची वाहने रेल्वे स्थानकांबाहेर बेकायदा पार्क केलेली असतात. बस थांब्यालगतही वाहनांचे पार्किंग करण्यात येते. त्यामुळे पार्किंग मिळवण्यासाठी आणि वाहन सुरक्षित ठेवण्यासाठी वाहनधारक निरनिराळे बेकायदा मार्ग शोधू लागले आहेत. त्याचा परिणाम नवी मुंबईतील वाहतूक व्यवस्थेवर होत आहे.

पार्किंगचा प्रश्न मोठा आहे. बेकायदा पार्किंगवर वाहतूक विभाग सातत्याने कारवाई करत आहे. नवी मुंबईत पार्किंगसाठी जर कोणी रस्त्यावरच खड्डे खोदून, खांब रोवून जागा अडवू पाहत असेल, तर त्यावर कारवाई करण्यात येईल. पालिकेनेही या ठिकाणाची पाहणी करून कारवाई करायला हवी. नेरुळ सेक्टर-२मध्ये होत असलेल्या बेकायदा पार्किंगवरही कारवाई करण्यात येईल.

– नितीन पवार, उपायुक्त, वाहतूक विभाग, नवी मुंबई</strong>

पार्किंगचे नियोजन फसले

नवी मुंबई महानगरपालिकेने वाहतूक पोलिसांच्या मदतीने महापालिका क्षेत्रात रस्त्याच्या एका बाजूला पार्किंग, वन वे – टू वे वाहतूक, नो-पार्किंग क्षेत्र असे विविध प्रकारचे नियोजन केले आहे. त्यासंदर्भातील सूचना फलकही लावण्यात आले आहेत. नेरुळ विभागात अनेक रस्त्यांवर ट्रक, कंटेनर, शाळा बस पार्क केल्या जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन रहदारीला अडथळा निर्माण होतो. त्यामुळे नागरिक बेकायदा पार्किंग करत आहेत.