महापालिका निवडणूक सक्षमपणे लढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न

विधानसभा निवडणुकीअगोदर नवी मुंबईत वाताहात झालेल्या  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्याने पुन्हा जोश आला आला आहे. चार महिन्यानंतर होणाऱ्या पालिका निवडणुकीच्या तयारीला पक्ष लागला आहे. माजी मंत्री व माथाडी नेते शशिकांत शिंदे शहरातील पक्षाची धुरा सांभाळणार असून पालिका निवडणुकीत पक्षाला पूर्ववैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

राष्ट्रवादीचे येथील सर्वेसर्वा माजी मंत्री गणेश नाईक यांनी विधानसभा निवडणुकी अगोदर भाजपची कास धरल्याने नवी मुंबईतील राष्ट्रवादी अगदीच विकलांग झाली होती. नाईक यांनी पक्षाचे दोन नगरसेवक वगळता सर्व नगरसेवक फोडल्याने पक्ष जिवंत ठेवण्याची जबाबदारी येथील अध्यक्ष व नगरसेवक अशोक गावडे यांच्यावर होती. बेलापूर व ऐरोली मतदारसंघात पक्षाला पडलेली मते ही लक्षवेधी आहेत. त्यामुळे पक्षाचे नेते व अध्यक्ष शरद पवार यांना मानणारा एक मोठा वर्ग आजही नवी मुंबईत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विधानसभा निवडणूक निकालाअगोदर ध्यानीमनी नसलेले शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्याने या पक्षाला शहरात पुन्हा उभारी आली आहे. चार महिन्यांनंतर होणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी पक्षाने सर्व जबाबदारी माथाडी नेते व पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यावर सोपविली आहे. बलाढय़ माथाडी संघटनेची ते गेली अनेक वर्षे नेतृत्व करीत असून ते नवी मुंबईकर (नेरुळ) आहेत. ग्रामीण मतदारांबाबत गाफील राहिल्याने त्यांचा कोरेगाव मतदार (सातारा) संघात एका नवख्या उमेदवाराकडून पराभव झाला. त्यामुळे विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी त्यांच्यावर नसल्याने त्यांची नियुक्ती नवी मुंबई प्रभारी म्हणून करण्यात आली आहे. उरणचे प्रशांत पाटील या कामी त्यांना साथ देणार आहेत. राज्यात महाविकास आघाडीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे सरकार अस्तित्वात आल्याने येथील कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले आहे.

१११ प्रभागांच्या तयारीला सुरुवात झाली आहे. यावेळची निवडणूक ही पॅनल पद्धतीने असल्याने आजूबाजूच्या सर्वपक्षीय नगरसेवकांना एकमेकांवर अवलंबून राहावे लागणार आहे. राज्यात झालेला महाविकास आघाडीचा प्रयोग नवी मुंबईत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तो किती यशस्वी होईल हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे मात्र तीन पक्षातील प्रभाग वाटपावरून हा तिढा सुटण्याची शक्यता कमी आहे. नवी मुंबईत आतापर्यंत आघाडी व युतीची निवडणूक झालेली नाही. शिंदे हे माथाडी नेते असल्याने राष्ट्रवादीची व्होट बँक असलेल्या माथाडी कामगाराचे ऐरोली व बेलापूर या दोन्ही मतदारसंघात प्राबल्य आहे. या कार्यकर्त्यांच्या जोरावर ही मोर्चे बांधणी आत्तापासून सुरू झाली असून प्रत्येक प्रभागातील बैठकांना सुरुवात होणार आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्याने आमचे मनोबल वाढले आहे. त्याचा फायदा पालिका निवडणुकीत होणार असून पक्षश्रेष्ठींच्या आदेशाप्रमाणे महाविकास आघाडीचा निर्णय घेतला जाणार आहे. माजी मंत्री शशिंकात शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेची निवडणूक लढविली जाणार असून आमची सत्ता पुन्हा येणार आहे.

अशोक गावडे, अध्यक्ष, राष्ट्रवादी, नवी मुंबई