नवीमुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात कार्यरत असलेल्या ३२ पोलीस कर्मचारी शुक्रवारी निवृत्त झाले. पोलिसी इतिहासात प्रथमच त्यांची निवृत्ती प्रक्रिया आणि कार्यक्रम ऑनलाईन पार पडला. यावेळी पोलीस आयुक्त संजयकुमार यांनी सर्वांशी ऑन लाईनच संवाद साधला. अगोदरच मनुष्यबळ कमी असताना आता कोरोनाच्या लढाईतील ३२ सैनिक निवृत्त झाल्याने ही पोकळी लवकर भरून काढणे गरजेचे आहे.

नवीमुंबई पोलीस आयुक्तालयमध्ये काम करणारे एक सहाय्यक पोलीस आयुक्त दोन पोलीस निरीक्षक यांच्यासह एकूण ३२ पोलीस कर्मचारी शुक्रीवारी निवृत्त झाले. एरव्ही निवृत्तीचा जंगी कार्यक्रम घेत त्यांना निरोप दिला जातो. त्यावेळी निवृत्त होणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सपत्नीक सत्कार आयुक्तांच्या हस्ते होत होता. तर त्यांच्या कार्यकाळातील उत्तम कामांचा धावता आढावा ही घेतला जात होता.

मात्र कोरोनाचा नवी मुंबईत झालेला उद्रेक पाहता जाहीर कार्यक्रम रद्द करण्यात आल्याने कर्मचारी काहीसे उदास दिसत होते.  मात्र अत्याधुनिक पद्धतीने ऑन लाईन हा कार्यक्रम घेण्यात आल्याने सुखद धक्का कर्मचाऱ्यांना बसला आहे. शुक्रवारी दुपारी चार वाजता हा कार्यक्रम सुरु झाला निवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी ज्या ठिकाणी कार्यरत होते त्याच ठिकाणी त्यांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला

सिस्को वेब पिट या अँपच्या माध्यमातून सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे एकाच वेळी सर्वच एकमेकांना ऑनलाईन पाहू शकत होते तर शेवटी आयुक्त संजयकुमार यांनी सर्वांशी संवाद साधत निरोप देताना आभार मानले. विशेष म्हणजे निवृत्त होतानाच्या समारोप प्रसंगी आयोजित कार्यक्रमात जसे सर्व कमर्चारी व अधिकाऱ्यांना मानपत्र अन्य कागदपत्रे देण्यात येतात ती सर्व कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीनेच देण्यात येणार आहेत अशी माहिती विशेष शाखा उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली.

नवीमुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात २० लाखांच्या आसपास लोकसंख्या आहे. त्यांच्या सरक्षणार्थ सुमारे ४ हजार ५०० पोलीस अधिकारी कर्मचारी आहेत. वास्तविक इतर वेळेसच हे मनुष्यबळ कमी आहे आता तर कोरोना विरोधातील लढाईत अतिरिक्त मनुष्य बळ आवश्यक आहे. त्यातच हे अधिकारी कर्मचारी निवृत्त झाल्याने अगोदरच कमी मनुष्यबळ असलेल्या नवीमुंबई पोलिसांना यांची पोकळी लवकर भरून काढणे आवश्यक आहे. ही लढाई कोरोना विरोधी असल्याने ५५ वर्षावरील पोलिसांना फारच आवश्यक असेल तर आणि पूर्ण सुरक्षित असेल तेथेच कर्तव्यावर पाठवण्यात येत होते आता  यातील शारीरिक क्षमता उत्तम असलेल्यांना कोरोना मुळे एक्सटेन्शन देता येणे शक्य नाही.