जेवणाला गोडी आणण्याच्या प्रयत्नांत गृहिणींच्या हाताशी असलेला कांदा करोना साथरोगाच्या काळात स्वस्त राहिला, हे उघड आहे. परंतु, कांदे स्वस्ताईची ही गोडी फार काळ  टिकून राहण्याची शक्यता अगदीच कमी आहे. वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील (एपीएमसी) कांदा-बटाटा बाजारात कांद्याच्या दरात वाढ झाली आहे आणि ही दरवाढ   साठेबाजीमुळे झाल्याचा दावा व्यापाऱ्यांनी केला आहे.

त्यातच कर्नाटकातील बेळगाव आणि हुबळी परिसरातील कांदा पावसात कुजल्याने त्याची आवक एपीएमसीत होऊ शकलेली नाही. त्यामुळे नाशिक, पुणे आणि नगर जिल्ह्य़ातील कांदा विक्रीसाठी बाजारात आला आहे. त्यातही यातील बराच कांदा भिजलेला आहे.

‘एपीएमसी’त १५ ऑगस्टपर्यंत कांद्याचे दर आवाक्यात होते. घाऊक बाजारात उत्तम प्रतीचा कांदा आठ ते दहा किलो दराने विकला जात होता. मात्र, त्यानंतर कांद्याच्या दरात झालेल्या वाढीने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. गेल्या पाच दिवसांत घाऊक बाजारात उत्तम कांद्याची विक्री १८ ते २० रुपये  किलो दराने होत आहे.

वाशी बाजारात कर्नाटकातील बेळगाव आणि हुबळी येथून कांद्याची आवक होते. ती ऑगस्टमध्ये झालेली नाही. सध्या वापरात असलेला कांदा हा राज्यातील आहे. या काळात फक्त साठवणुकीचा कांदा विक्रीसाठी बाहेर काढला जात आहे. काही प्रमाणात दरवाढ आटोक्यात ठेवण्यास साह्य़कारी ठरणारा दक्षिणेकडील कांदा आणि राज्यातील नवा कांदा बाजारात येण्यास आता दिवाळी उजाडणार आहे. तोवर पावसाळ्यात वधारलेला कांदाच बाजारात असेल, असे व्यापारी दिगंबर राऊत यांनी सांगितले.

सध्या पावसात भिजलेल्या कांद्याला नऊ ते दहा रुपये, तर उत्तम प्रतीच्या कांद्याला १९ ते २० रुपये दर मिळत आहे. २०१९मध्ये पावसाने दिवाळीपर्यंत मुक्काम लांबवल्याने नवा कांदा बाजारात आला नव्हता. त्यामुळे कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली होती.  पावसाच्या आरंभीस कांद्याच्या दरात वाढ होते. मात्र, यंदा करोना आणि टाळेबंदीमुळे कांदा सामान्य ग्राहकांच्या आवाक्यात होता.

दरवाढ का?

१५ ऑगस्टनंतर घाऊक बाजारात कांद्याच्या दरात प्रतिकिलोमागे दहा रुपयांची वाढ झाली. यामागे कांद्याची साठेबाजी असल्याचे कारण व्यापारी पुढे करीत आहेत. राज्याबाहेरील कांदा वाशी बाजारात येत नाही आणि राज्यातील कांद्याला देशभरात मागणी आहे. त्यामुळे कांदादरात वाढ झाली आहे. त्यातच मोठे व्यापारी, खरेदीदार शेतकऱ्यांकडून उन्हाळ्यात कांदा खरेदी करून तो साठवतात. चाळी वा गोदामांमध्ये या कांद्याची साठवणूक केली जाते. विक्रीसाठी व्यापारी पावसाळ्याची  वाट बघतात. जून वा जुलै महिन्यात  दर बघून कांदा विक्रीसाठी बाहेर काढला जातो. नाशिक आणि पुणे बाजारात कांद्याची कृत्रिम दरवाढ होत असल्याची माहिती घाऊक व्यापारी मनोहर तोतलानी यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.