नवी मुंबई महापालिकेचे नवे आदेश; तीन वेळा नियम मोडल्यास करोना काळ संपेपर्यंत दुकान बंद; उद्याने बंदच राहणार

नवी मुंबई : पंचस्तरीय विभागणीनुसार नवी मुंबई दुसऱ्या टप्प्यात येत असल्याने सोमवारी महापालिका प्रशासनाने निर्बंध उठवत असल्याची घोषणा केली. मात्र वेळांबाबत स्पष्ट उल्लेख नसल्याने दुकाने, मॉल, बार आणि रेस्टॉरंट चालकांमध्ये गोंधळ उडाला. कोणी चार वाजता शटर बंद केले, तर कोणी रात्री अकरा वाजता. त्यामुळे पालिका आयुक्तांनी नव्याने आदेश काढले आहेत. यात सर्व प्रकारची दुकाने रात्री दहा वाजेपर्यंत बंद राहतील.

मॉलमधील दुकाने ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवायची म्हणजे कशी तसेच दुकाने नियमित वेळेनुसार सुरू ठेवायची म्हणजे किती वाजेपर्यंत हे पालिकेने काढलेल्या आदेशात स्पष्ट करण्यात आले नव्हते. त्यामुळे सर्व अस्थापनांमध्ये सोमवारी पहिल्याच दिवशी गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे पालिका आयुक्तांनी मंगळवारी १४ जूनपर्यंत नवे आदेश काढले आहेत. तसेच नियमावली तोडल्यास कडक निर्बंध व दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

त्यानुसार औषधांची दुकाने वगळता अत्यावश्यक सेवेतील दुकाने व इतर सर्व दुकाने रात्री १० वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत. त्यानंतर दुकाने सुरू ठेवल्यास १० हजारांचा दंड करण्यात येणार आहे. हॉटेल, खानावळी, बार, पब हे रात्री ११ पर्यंत सुरू राहतील. त्यानंतर सुरू राहिल्यास त्यांना ५० हजारांचा दंड करण्यात येणार आहे. मॉलमधील दुकाने १० वाजता बंद करण्यात येतील. त्यानंतरही दुकाने सुरू राहिल्यास  ५० हजारांचा दंड ठोठावण्यात येईल. तसेच मॉलमधील दुकाने ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवताना एका आड एक दुकाने आळीपाळीने सुरू ठेवावी लागणार आहेत.

या नियमांसह अस्थापनांनी पहिल्यांदा नियम मोडल्यास दंड आकारला जाईल. मात्र दुसऱ्यांदा नियम मोडल्यास सात दिवसांसाठी दुकाने बंद करण्यात येतील. तर तिसऱ्या वेळेस नियमाचे पालन न केल्यास करोना काळ संपेपर्यंत दुकाने बंद करण्यात येतील असे आदेशात म्हटले आहे.

शहरातील आठवडे बाजार हे पूर्णपणे बंद राहणार आहेत. तर डी मार्ट, बिग बझार यांनाही रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. मात्र सामाजिक अंतर व तपासणी बंधनकारक केली आहे. हे नियम मोडल्यास ५० हजारांचा दंड आकारण्यात येणार आहे. व्यायामशाळा, केशकर्तनालये, पार्लर, स्पा  ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील. नियमभंग केल्यास १० हजार दंड आकारण्यात येणार आहे.

दुकानदार, हॉटेल, मॉल व इतर आस्थापना यांच्या वेळांबाबत संभ्रम निर्माण झाल्याने पालिकेने मंगळवारी सुस्पष्ट आदेश लागू केले आहेत. करोनाच्या तिसऱ्या लाटेपासून दूर राहण्यासाठी शहरातील सर्व नागरिक व व्यावसायिकांनी नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे आवश्यकआहे. नियम मोडल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे. -अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका