महापालिकेत एकात्मिक योजनेअंतर्गत मंजुरी
एकात्मिक योजनेअंतर्गत सीबीडी बेलापूर सेक्टर-१५ मध्ये नव्याने पथदिवे लावण्याच्या प्रस्तावाला नवी मुंबई महानगरपालिकेच्या गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. या कामासाठी दोन कोटी २९ लाख ८२ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत. याच वेळी ऐरोली सेक्टर १५ मध्ये बांधकाम सुरू असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या घुमटाला संगमरवरी आच्छादन करण्याच्या प्रस्तावाला या सभेत मंजुरी मिळाली. या कामासाठी १९ कोटी ३२ लाख रुपये खर्च येणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकास आर.सी.सी. डोम आकाराच्या वास्तूस आच्छादन करण्यात येणार होते; परंतु वास्तूची भव्यता लक्षात घेता वास्तूस जी.आर.सी.ऐवजी दिल्ली येथील कमल मंदिराप्रमाणे (लोटस टेम्पल) संगमरवरी आच्छादन करण्याची सूचना महापौर सुधाकर सोनवणे यांनी केली होती. त्यानुसार सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मंजुरीसाठी आला. स्मारकाच्या घुमटाला जी.आर.सी. करण्यासाठी लागणारा खर्च चार कोटी ३५ लाख २३ हजार ९०० रुपये खर्च होणार होता; पण संगमरवरी आच्छादनामुळे तो वाढून १९ कोटी ३२ लाख रुपये झाला.