संतोष जाधव

नवी मुंबई महापालिकेच्या इतिहासात प्रथम पॅनल पद्धतीने निवडणुका होणार असल्याची माहिती महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. २०२०च्या साधारणत: एप्रिल महिन्यात या निवडणुका होणार आहेत.

२०११च्या जनगणनेच्या आधारे लोकसंख्या ग्राह्य़ धरून प्रभागांची फेररचना होणार आहे. पॅनल पद्धतीमुळे नगरसेवकांना चार प्रभागांत प्रभाव दाखवावा लागणार आहे. पनवेल, ठाणे महापालिकेनंतर आता नवी मुंबई पालिकेची निवडणुक पॅनल पद्धतीने होणार आहे. २०१५मध्ये झालेल्या निवडणुकीत१११ प्रभाग होते. मागील निवडणूक ही २७ एप्रिल २०१५ला झाली होती. तर ९ मे रोजी महापौरांची निवड करण्यात आली. त्यामुळे हा कार्यकाल पूर्ण होण्याआधीच महापालिकेच्या निवडणुका येत्या एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता आहे.

याबाबत प्राथमिक कामकाजाला सुरुवात झाली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नवी मुंबई पालिकेची २०११च्या जनगणनेनुसार लोकसंख्या ११ लाख १९ हजार ४७७ आहे. त्यामुळे या लोकसंख्येच्या आधारे प्रभागांची फेररचना होणार आहे. कमीत कमी तीन आणि जास्तीत जास्त पाच प्रभागांचा एक पॅनेल तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे चार प्रभागांचे १ पॅनेल तयार करण्यात येणार असून उर्वरित पॅनेलमध्ये ३ वा ५ प्रभाग करण्यात येणार आहेत. अंदाजे ३० पॅनेल होण्याची शक्यता आहे. पॅनेल पद्धतीत मतदाराला पॅनेलमध्ये असलेल्या चारही प्रभागांतील उमेदवारांना मतदान करण्याची संधी मिळणार आहे. महिलांसाठी ५० टक्के आरक्षण तसेच विविध आरक्षण आहेत.

घराणेशाहीचे काय?

नवी मुंबई महापालिकेत एकाच कुटुंबातील २ ते ३ नगरसेवकही आहेत. त्यामुळे या घराणेशाहीचे पॅनेल पद्धतीमुळे भले होणार की दुसऱ्याच पॅनेलला जोडल्यामुळे कसरत करावी लागणार याचे चित्र पॅनेल निश्चित झाल्यानंतर समोर येणार आहे. दुसरीकडे आमदारकीच्या निवडणुकीत एकाच घरात दोन तिकिटे नाही, या शिरस्त्यामुळे एकच तिकीट मिळाले. तसेच पालिका निवडणुकीतही भाजपमध्ये गेलेल्या नगरसेवकांनाएका घरात एकच तिकीट, असा नियम लावल्यास अनेकांच्या आशांवर पाणी पडणार आहे. त्यामुळे पॅनेल पद्धतीची धास्ती सर्वपक्षीय नगरसेवकांना लागली आहे.

नवी मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक ही पॅनेल पद्धतीने होणार असून २०११ च्या जनगणनेचा आधार घेत प्रभागांची रचना व पॅनेलची रचना करण्यात येणार असून निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे कार्यवाहीला सुरुवात करण्यात येत आहे.

– अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त नवी मुंबई महापालिका