नववर्ष स्वागतासाठी मुंबईबाहेर जाणाऱ्या नागरिकांच्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी

नाताळ सणाला जोडून सरकारी आणि खासगी कार्यालयांना मिळालेल्या तीन दिवसांच्या सुट्टी काळात शीव-पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. यात ठाणे-बेलापूर मार्गावर वाहतूक कोंडीचा चालकांना सामना करावा लागला होता. मात्र पुन्हा हीच स्थिती शुक्रवारपासून उद्भवण्याची शक्यता आहे. नववर्ष स्वागताच्या जल्लोषासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबईबाहेर जाणाऱ्या वाहनांमुळे दोन्ही मार्गावर वाहतूक कोंडी होणार असल्याने वाहतूक पोलिसांनी उपाययोजना आखली आहे.

शुक्रवारी, संध्याकाळी आणि शनिवारी सकाळी नववर्षांच्या स्वागतासाठी मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील अनेक जण  लोणावळा, खंडाळा, अलिबाग आणि पनवेल या ठिकाणी असलेल्या पर्यटनस्थळांवर जाणार आहेत. त्याची तयारी सुरू झाली असून सध्या वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे शीव-पनवेल, तसेच ठाणे-बेलापूर या नवी मुंबईतील दोन महामार्गावर मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचे मागील आठवडय़ात दिसून आले आहे. गेल्या सोमवारी नाताळ सुट्टीच्या मेजवान्या आटोपून परतणाऱ्या मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील वाहनांमुळे शीव-पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.

शुक्रवारी होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी पामबीच आणि एमआयडीसीतील अंतर्गत रस्त्यांवरून वाहतूक वळविण्याचा निर्णय घेतला आहे.

वाशी टोल नाक्यामुळे अलीकडे मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसून आले आहे. हाच प्रकार ऐरोली येथील टोल नाक्यामुळे होत असून ऐरोली येथील सेक्टर पाचवरील वळणावर या वाहतूक कोंडीचा परिणाम दिसून येत आहे. कोकणात जाणाऱ्या जड वाहतुकीवर या काळात बंदी घालण्यात आल्याने गोवा वा अलिबाग पर्यटन स्थळाकडे जाणाऱ्या पर्यटकांना थोडा दिलासा मिळणार आहे. या तीन दिवसांत एकाच वेळी हजारो वाहने मुंबईबाहेर निघणार असल्याने मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवरही वाहतूक कोंडीचा शक्यता आहे. यात अमृतांजन पूल परिसरात मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता पोलीस व्यक्त करीत आहेत. मागील आठवडय़ातील वाहतूक कोंडीचा अनुभव पाहता ठाणे-बेलापूर आणि शीव पनवेल महामार्गावरील वाहतूक कोंडीचे नियोजन करण्यात येत आहे. यासाठी पामबीच आणि एमआयडीसीतील काही पर्यायी रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्यास वळविता येण्यासारखी आहे.

नितीन पवार, उपायुक्त (वाहतूक), नवी मुंबई पोलीस