स्वच्छ शहराचा मिळालेला बहुमान कायम ठेवणे, आरोग्याची सर्वतोपरी काळजी आणि शिक्षणाचा दर्जा अधिक  उंचावणे ही आपल्या कामाची त्रिसूत्री राहणार असल्याचे नवनियुक्त आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी स्पष्ट केली. यापूर्वीची सर्व शिल्लक कामे मार्गी लावण्यावर भर दिला जाणार असून शहराची विकास नियंत्रण नियमावली मंजूर करण्यासाठी सर्वपक्षीय प्रयत्न केले जाणार असल्याचे मिसाळ यांनी सांगितले. ग्रामीण भागाच्या विकासाचा वेगळा विचार करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पालिकेचे माजी आयुक्त डॉ. रामास्वामी यांची सव्वादोन वर्षांनंतर मागील आठवडय़ात बदली झाली आहे. त्यांच्या जागी एमआयडीसीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांची राज्य शासनाने नियुक्ती केली आहे. नवी मुंबई पालिका हे केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात नेहमीच अव्वल राहिली आहे. गेल्या वर्षी शहराला सातवे मानांकन मिळालेले आहे. हा बहुमान टिकवण्याची जबाबदारी वाढली असून पहिल्या तीनमध्ये येण्याचे लक्ष समोर ठेवण्यात आले आहे. तसे आदेश सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले गेले आहेत. स्वच्छता ही सर्वाची जबाबदारी असून ती एक सवय होण्याची गरज आहे. या स्वच्छतेशी आरोग्य निगडित आहे. त्यामुळे दुसरे प्राधान्य हे शहरातील आरोग्य सेवेला आहे. नवी मुंबईतील आरोग्य सेवा ही उत्तम आहे, पण सार्वजनिक आरोग्य सेवा सुधारण्यावर भर दिला जाणार आहे. या आरोग्य सेवेचा उपयोग आजूबाजूच्या उपनगरातील नागरिक घेत असल्याने आरोग्य सेवेवरील ताण वाढला आहे. त्यामुळे या आरोग्य सेवेचा स्तर अधिक उंचावण्यासाठी लवकरच डॉक्टर आणि डॉक्टरेतर कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. शहरातील दोन मोठी रुग्णालये अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाहीत. ती येत्या सहा महिन्यांत सर्व सुविधांनी परिपूर्ण केली जाणार असून कार्यान्वित करण्यात येणार आहेत. आरोग्य सेवेचे विक्रेंदीकरण झाल्यानंतर वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयावर येणारा ताण कमी होणार आहे. शहरातील शिक्षण व्यवस्था चांगली आहे. इतर शहरांत शिक्षण व्यवस्थेबाबत अनेक तक्रारी आहेत.

विद्यार्थ्यांच्या प्रतिसादामुळे पालिकेने सीबीएसईच्या शाळा सुरू  केल्या आहेत. या सर्व आधुनिकीकरणाकडे आता लक्ष देऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ता अधिक वाढेल याकडे पाहिले जाणार आहे. कोणतीही गोष्ट उभारणे सोपे आहे, पण ती टिकवण्याची जबाबदारी त्यापेक्षा मोठी असल्याची जाणीव आपणास असल्याचे मिसाळ यांनी सांगितले. पालिकेची छोटी-मोठी सात हजार कामे सुरू आहेत. त्यांच्या पूर्णत्वावर भर दिला जाणार आहे. राज्यातील अनेक गावांच्या पुनर्वसनाचा अनुभव असलेल्या मिसाळ यांनी नवी मुंबईतील गावांचा झालेला अस्ताव्यस्त विकास सुरळीत करण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्यासाठी ग्रामस्थांच्या प्रबोधनावर भर दिला जाणार आहे. कोकणातील खारफुटीचे संवर्धन आणि संरक्षण करण्याबाबत अनेक उपाययोजना तयार करणाऱ्या नवीन आयुक्तांनी नवी मुंबईतील खारफुटीला वेगळे आयाम देण्याचा विचार व्यक्त केला आहे. जनतेसाठी राबविण्यात येणारी सार्वजनिक हिताची धोरणे आणि व्यवस्थापन यांचा परदेशात (नेदरलॅण्ड) खास अभ्यास केलेले मिसाळ यांनी नवी मुंबईला एका उंचीवर नेण्याची इच्छा व्यक्त केली आहे.