पावसाळ्यानंतरच दुरुस्तीची शक्यता

जगदीश तांडेल, उरण

नवी मुंबईचे एक उपनगर म्हणून सिडकोने नव्याने विकसित केलेला उलवे नोड सध्या खड्डय़ात गेला आहे. पावसामुळे सर्वच रस्त्यांवर खोल खोल खड्डे पडले असून वाहतुकीसाठी रस्ते धोक्याचे झाले असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

नवी मुंबईचाच एक भाग म्हणून सिडकोने उलवे नोड विकसित केला असून येथील नागरी सुविधा पुरविण्याची जबाबदारी ही सिडकोची आहे. मात्र पुरेशा सुविधा मिळत नसल्याने येथील नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. त्यात आता पावसामुळे रस्त्यांची चाळण

झाली आहे. सगून चौक, सेक्टर ९, बामणडोंगरी गावाशेजारी, सेक्टर १८, १९, उलवे नोडचे प्रवेशद्वार असलेल्या वहाळ गावाच्या पुढे तसेच मोरावे गावाजवळ रस्त्याला खड्डे पडले आहेत.

नवी मुंबईपासून पाच ते सहा किलो मीटरवर उलवे नोड आहे. रेल्वेसेवा सुरू झाल्यापासून येथील लोकवस्तीतही वाढ झाली आहे. तसेच नवी मुंबई परिवहनची बस सेवाही असल्याने हा परिसर झपाटय़ाने विकसित होत आहे. मात्र, सिडकोकडून येथील रस्त्यांची कामे केल्यानंतर ती अनेक ठिकाणी विविध कारणांनी खोदण्यात   आलेली होती. याचा फटका येथील नागरिकांना बसला आहे.

सेक्टर १७, १८ तसेच महत्त्वाच्या असलेल्या सेक्टर १९ मधील रस्त्यांना दुतर्फा खड्डे पडलेले आहेत.  येथे राहायला येऊन आम्हाला पाच वर्षे झाली, मात्र येथील नागरी सुविधा अपुऱ्या आहेत. प्रामुख्याने रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे मोठी गैरसोय होत असल्याचे गौरी पाटील यांनी सांगितले. सिडकोने खड्डे त्वरित भरण्याची मागणी त्यांनी केली आहे.

या संदर्भात सिडकोचे अधीक्षक अभियंता रमेश गिरी यांच्याशी संपर्क साधला असता उलवे नोडमधील खड्डे भरण्याचे काम देण्यात आलेले असून पावसाचे प्रमाण कमी होताच येथील खड्डे बुजविण्यात येतील, असे सांगितले.

उलवे नोड परिसरातील रस्त्यावर दीड ते दोन फुटाचे खड्डे पडलेले आहेत. या खड्डय़ांतून पायी प्रवास करणेही अवघड बनले आहे. ही परिस्थिती सिडकोने बदलावी.

-अतीष काळे, उलवे नोड रहिवासी

शहरांचे शिल्पकार म्हणून बिरूद मिरविणाऱ्या सिडकोकडून दरवर्षी रस्त्यांच्या कामांसाठी कोटय़वधी रुपयांचा निधी खर्च केला जात आहे. पावसाचे कारण पुढे करून जनतेचे कोटय़वधी रुपये पाण्यात घातले जात आहेत. यात बदल करण्याची गरज असून टिकाऊ रस्ते कधी होणार व नागरिकांची खड्डय़ांतून मुक्तता केव्हा होणार?

-बाळकृष्ण घरत, उलवे नोड रहिवासी