26 March 2019

News Flash

महापालिकेकडून कारवाईचा धडाका

स्वयंपाकघर, स्नानगृह, शेड, प्रवेशद्वार आणि गच्चीवरील पत्र्याचे छत पाडण्यात आले.

नवी मुंबईत फेरीवाले, नळजोडण्या, हॉटेलवर बडगा

तुर्भे सेक्टर १९ येथील कृषी उत्पन्न बाजार परिसरातील हॉटेल सैराटमधील अनधिकृत बांधकामावर महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने बुधवारी कारवाई केली. या हॉटेलला तुर्भे विभाग कार्यालयाने एमआरटीपी कायदा १९६६च्या कलम ५३ (१) नुसार नोटीस बजावली होती. तरीही हे अनधिकृत बांधकाम कायम ठेवण्यात आले होते. त्यामुळे स्वयंपाकघर, स्नानगृह, शेड, प्रवेशद्वार आणि गच्चीवरील पत्र्याचे छत पाडण्यात आले.

एक जेसीबी, गॅस कटर, १५ मजूर आणि तुर्भे विभागातील अधिकारी, कर्मचारी, स्थानिक पोलीस अधिकारी, अतिक्रमण विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. कारवाईसाठी झालेला एक लाख रुपये खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात आला. या परिसरात रस्ते, पदपथांवर अनधिकृतरीत्या व्यवसाय करणाऱ्या ५०० हून अधिक फेरीवाल्यांवर धडक कारवाई करण्यात आली. दोन ट्रक व दोन पिकअप व्हॅन भरून साहित्य जप्त करण्यात आले.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना समाधानकारक पाणीपुरवठा केला जात असतानाच जलबचतीकडेही विशेष लक्ष दिले जात आहे. त्यासाठी शहरातील अनधिकृत नळजोडण्या खंडित करण्याची तसेच ग्राहकांनी त्यांच्या नळजोडण्यांवर बसविलेले बुस्टर पंप काढण्याची कार्यवाही शहर अभियंता मोहन डगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त शहर अभियंता सुरेंद्र पाटील यांच्या नियंत्रणाखाली करण्यात आली.

१४८ अनधिकृत नळजोडण्या खंडीत

आठवडाभरात १४८ अनधिकृत नळजोडण्या खंडीत करण्यात आल्या ६२ बुस्टर पंप हटविण्यात आले. सर्व आठही विभाग कार्यालय क्षेत्रांमध्ये नियमितपणे अनधिकृत नळजोडण्या शोध मोहीम सुरू आहे. मे २०१७ पासून १० हजार ७२० अनधिकृत नळजोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत.

First Published on March 9, 2018 2:23 am

Web Title: nmmc action on illegal encroachment