विकास महाडिक, लोकसत्ता

मे महिन्यात पाच वर्षे पूर्ण करणाऱ्या १११ नगरसेवकांच्या अपेक्षाचे प्रतिबिंब मंगळवारी पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सादर केलेल्या त्यांच्या पहिल्या अर्थसंकल्पात मांडले आहे. शहरातील लहान मुले, तरुण, विद्यार्थी, ज्येष्ठ  नागरिक, महिला आणि सामान्य नागरिक हे घटक समाधानी होतील, असा तीन हजार आठशे कोटी रुपये खर्चाचा अर्थसंकल्प आयुक्तांनी मांडला आहे. गेली तीन वर्षे शिल्लक राहिलेले दोन हजार कोटी रुपयेही खर्च करण्याचे जाहीर करण्यात आल्याने सत्ताधारी पक्षाला या पालिका निवडणुकीतील हा एक प्रकारचा जाहीरनामाच झाला आहे.

माजी पालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी पालिकेच्या काही अवास्तव कामांना कात्री लावली होती. अवाच्यासव्वा दराने निविदा भरणाऱ्या ठेकेदारांना कमीत कमी दरात काम करण्यास भाग पाडले होते. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत एक हजार ९०५ कोटी रुपये शिल्लक राहिले होते. त्यातील एक हजार २१७ कोटी रुपयांच्या शिलकीसह ३ हजार ८५० कोटी आणि जवळपास तेवढाच खर्च करणारा २०२०-२१ चा अर्थसंकल्प पालिका आयुक्तांनी मंगळवारी शेवटच्या स्थायी समिती सभागृहात मांडला. स्थानिक संस्था, मालमत्ता कर, विकास शुल्क, पाणी पट्टी, परवाना शुल्क, अतिक्रमण शुल्क, मोरबे धरण, रस्ते खोदकाम, आरोग्य सेवा, केंद्र आणि राज्य शासनाचे अुनदान, आणि इतर जमेच्या जोरावर पालिकेने यंदा थेट तीन हजार ८०० कोटी रुपये खर्चाचा अर्थसंकल्प सादर केला आहे.

सत्ताधारी पक्षाचे सल्लागार आमदार गणेश नाईक यांनी गेली २५ वर्षे पालिकेत सत्ता कायम ठेवण्यासाठी शहरवासियांना मालमत्ता व पाणी कर वाढविणार नाही, असे आश्वासन दिले होते. त्यामुळे नवी मुंबईत ही दरवाढ झालेली नाही. सहाव्या पालिका निवडणुकीला समोरे जाताना पुढील पाच वर्षांसाठी सत्ता पुन्हा हाती दिल्यास ही दरवाढ होणार नाही, असे आश्वासन नाईक यांनी दिले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात पालिकेने मालमत्ता करवाढीचे कोणतेही संकेत दिलेले नाही, पण पाणी पुरवठय़ात होणारी १५ कोटी रुपयांची तूट भरून काढण्यासाठी पाणी पट्टी आणि करवाढीतून ही तूट भरून काढण्याचे  संकेत दिलेआहेत. याशिवाय पालिकेने सिडकोकडून ५२० आणि एमआयडीसीकडून २३३ भूखंडांची नागरी सेवांसाठी मागणी केली आहे. त्यामुळे नागरिकांना अधिक सोयी मिळणार आहेत. या सर्व नागरी सुविधांवर पालिका जवळपास एक हजार कोटी रुपये खर्च करणार आहे.

शिक्षण, आरोग्य, वाहतूक, या सेवा अद्ययावत करताना पालिका या सेवांवर सुमारे ५०० कोटी रुपये खर्च करणार आहे. नवी मुंबई पालिका क्षेत्राची उभारणी सिडकोने केल्याने ती नियोजित आणि आखीवरेखीव आहे. पालिकेने गेल्या ३० वर्षांक चांगल्या नागरी सुविधांची उभारणी केली आहे.  गेली १२ वर्षे रखडलेला पामबीच विस्तार मार्ग सिडकोच्या अर्थसहाय्यावर पूर्ण केला जाणार आहे. त्यामुळे विकसनशील असलेला घणसोली  नोड अच्छे दिन येणार आहेत. बेलापूरमधील सिडको मुख्यालय भागात तसेच पामबीच मार्गावरील अरेंजा कॉर्नर ते कोपरी गावापर्यंत उड्डाणपूल वाहनचालकांना दिलासा देणारे ठरणार आहेत. घणसोली येथील अद्ययावत क्रीडा संकुल, एखाद्या खेळाला वाहिलेली मैदाने, पावसाळी नाल्यांची दुरुस्ताी, पशुवधगृह, सर्व गाव व वेशीवर प्रवेशद्वार जैवइंधन युनिट मध्यवर्ती ग्रंथालय हे संपूर्ण शहराचा चेहरामोहरा बदलणारे प्रकल्प ठरणार आहेत.

पालिकेत काही महिन्यापूर्वी राष्ट्रवादीची सत्ता जाऊन भाजपची सत्ता आली आहे. नाईक यांना या निवडणुकीत महाविकास आघाडीचा सामना करावा लागणार आहे. विकासपुरुष म्हणून नाईकांची प्रतिमा पक्षाने तयार केली आहे. भाजपचा समाजमाध्यम केंद्राने अशा प्रकारे प्रचाराला सुरुवातही केली आहे. कॉलेज व वृद्धाश्रम सुरू करणारी नवी मुंबई पालिका ही देशातील पहिली पालिका ठरणार आहे. राहण्यास योग्य शहर म्हणून केंद्र सरकारने नवी मुंबईला यापूर्वीच गौरविले आहे, तर स्वच्छतेबाबत नवी मुंबई राज्यात पहिली आणि देशात सातव्या क्रमांकावर आहे. सिडको आणि पालिकेने तयार केलेल्या सुविधांची देखभाल करण्याची मोठी जबाबदारी पालिकेवर आहे.

सायन्स पार्क, सायकल मार्गिका, अपंग विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न हे पालिकेची वेगळी ओळख तयार करीत आहे. प्रत्येक प्रभागातील नागरी सुविधा बऱ्याच अंशी सोडवणूक झाल्याने यंदाच्या  निवडणुकीत विद्यमान नगरसेवकांनी हे मी केले सांगण्यास बराच वाव आहे तर सत्ताधारी पक्षाचा हा एक प्रकारे जाहिरनामा जाहीर झाला आहे.