‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रमात पालिका आयुक्तांकडून अपेक्षा; अतिक्रमणावर कारवाईचे संकेत

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पुरविल्या जाणाऱ्या नागरी सुविधांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेऊन त्यांचा योग्यरीतीने वापर करणे ही नागरिकांचीही जबाबदारी आहे. याच वेळी शहराच्या विकासासाठी प्रत्येक घटकाचा सहभाग अपेक्षित आहे, अशी अपेक्षा महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ऐरोली रेल्वेस्थानक परिसरात शनिवारी झालेल्या ‘वॉक विथ कमिशनर’ या उपक्रमात व्यक्त केला.

या वेळी नागरिकांनी समस्या मांडल्या. यात अतिक्रमणाबाबतच्या तक्रारींचा समावेश होता. या वेळी मुंढे यांनी अतिक्रमणांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.

नागरिकांनी रीतसर बांधकाम परवानगी घेऊनच बांधकाम करावे. यासाठी पालिकेने बांधकाम परवानगी प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी कागदपत्रांची संख्या ४० वरून सात वर आणल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली.

आयुक्तांचा नागरिकांना सल्ला

  • पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी पालिका आणि वाहतूक पोलीस विभाग यांनी मिळून संपूर्ण शहरासाठी पार्किंग नियोजन केले आहे. याबाबत नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागविण्यात आल्या आहेत.
  • नागरिकांनी पालिकेच्या संकेतस्थळावर लेखी सूचना कराव्यात. याच वेळी नागरिकांनीही वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, योग्य जागी गाडी उभी करावी. सोसायटीच्या आवारातील जागेचा योग्य वापर करावा.
  • कचऱ्याचे ओला आणि सुका असे वर्गीकरण करावे. नागरी समस्यांविषयी पालिकेला जागृत करण्यासाठी आणि सुविधांचा लाभ घेण्यासाठी पालिकेच्या nmmc.gov.in या संकेतस्थळावर ‘तक्रार निवारण प्रणाली’चा  (public grievance system) जास्तीत जास्त उपयोग करावा.

अतिरिक्त पोलीस संरक्षण

वॉक विथ कमिशनर या उपक्रमात आयुक्त सुरुवातीला नागरिकांशी थेट संवाद साधत असत. यासाठी त्यांच्यासोबत एक पोलीस कर्मचारी होता. आयुक्तांच्या विरोधात पालिकेत अविश्वासाचा ठराव मांडण्यात आल्यानंतर आयुक्तांना अतिरिक्त पोलीस संरक्षण देण्यात आले. शनिवारी झालेल्या ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रमात आयुक्तांना अतिरिक्त संरक्षण दिले आहे.