पालिकेचा दावा; द्रवरूप प्रकल्प उभारणार

नवी मुंबई</strong> : राज्यात प्राणवायूचा तुटवडा भासत असताना नवी मुंबई पालिकेकडे मात्र सहा महिने पुरेल एवढा प्राणवायूचा साठा असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. त्याचबरोबर लवकरच द्रवरूप प्राणवायू प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचे पालिका आयुक्तांनी सांगितले.

नवी मुंबईत करोनाबाधितांची संख्या ३० हजार पार झाली असून मृतांची संख्या ६६० इतकी झाली आहे. दररोज बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने गेल्या आठवडय़ात आरोग्य सुविधांत मोठय़ा प्रमाणात वाढ केली आहे. शहरात तीन हजार प्राणवायू असलेल्या खाटांचे नियोजन केले असून सध्या २ हजार २६६ प्राणवायू असलेल्या खाटा उपलब्ध आहेत. ६०० खाटांचे काम सुरू आहे. त्यामुळे प्राणवायू न मिळाल्याने कोणत्याही रुग्णाचा मृत्यू होणार नाही याची काळजी पालिका प्रशासन घेत आहे. सध्या पालिकेकडे तीन महिने पुरेल एवढा प्राणवायू साठा असून पुढील तीन महिन्यांसाठी आवश्यक मागणीही करण्यात आली आहे. दोन दिवसांत ही मागणी पूर्ण होईल. त्यामुळे किमान सहा महिने पुरेल ऐवढा प्राणवायू साठा असणार आहे. महापालिकेला प्राणवायू पुरवणारी कंपनी ही महापालिका क्षेत्रातच असल्याने त्यांनी आवश्यक साठा पुरविला आहे.

पालिका रुग्णालयातील रुग्णांना सिलेंडरद्वारे प्राणवायू पुरवला जात आहे. पालिकेकडे दवरूप प्राणवायू पुरविणारी यंत्रणा नाही. मोठय़ा आकाराचे सिलेंडर असून सध्या डुरा सिलेंडर व इतर सिलेंडरद्वारे प्राणवायू सुविधा परविण्यात येत आहे. लवकरच द्रवरूप पुरविणारी यंत्रणाही उभारण्यात येणार असून त्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली असल्याचे पालिका आयुक्तांनी सांगितले.

करोना चाचण्या  वाढविण्यात आल्या असून आतापर्यंत १ लाख ६० हजार जणांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यात ६२,६२२ आरटीपीसीआर चाचण्यांचा समावेश आहे.

प्राणवायू असलेल्या खाटा मोठय़ा प्रमाणात तयार करण्यात आल्या असून पुढील ३ महिने पुरेल एवढा प्राणवायू शिल्लक आहे. आणखी तीन महिन्यांचा साठा दोन दिवसांत येईल. त्यामुळे प्राणवायूची कोणतीही कमतरता शहरात नाही. पालिकेकडे १७५ क्युबिक मीटर  क्षमता असलेले सिलेंडर आहेत.

– अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका

शहरातील खाटांची स्थिती

३३०९ साध्या खाटा

२२६६ प्राणवायू खाटा

३३५ आयसीयू

१३५ कृत्रिम श्वसन यंत्रणा