नवी मुंबई महापालिकेचे स्वच्छ सर्वेक्षण ७ फेब्रुवारीनंतर होणार असल्याची माहिती पालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. महाराष्ट्र शासनाने यंदा स्वच्छ सर्वेक्षणात  देशभरातून पहिल्या तीन क्रमांकांत येणाऱ्या महाराष्ट्रातील शहरांना २० कोटींचे आणि चौथ्या ते दहाव्या क्रमांकांत येणाऱ्या महाराष्ट्रातील शहरांना १५ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. त्यामुळे गेल्या वर्षी महाराष्ट्रात पहिले व देशात आठवे स्थान मिळवणारी नवी मुंबई कोणते बक्षीस मिळवते, या विषयी सर्वानाच उत्सुकता आहे.

गेल्या वर्षी स्पर्धेत कमी शहरे सहभागी झाली होती. परंतु यंदा स्वच्छ शहर सर्वेक्षणात एकूण चार हजार ४१ शहरे सहभागी झाली आहेत. दिल्या जाणाऱ्या गुणांमध्येही बदल करण्यात आला आहे. गेल्या वर्षी एकूण २ हजारांपैकी गुण दिले गेले होते. परंतु यंदा प्रत्येक शहराला चार हजारपैकी गुण दिले जाणार आहेत. जास्त गुण मिळवणाऱ्या शहरांना पारितोषिक दिले जाणार आहे. गेल्या वर्षी नवी मुंबई महापालिकेने दोन हजारपैकी एक हजार ७०५ गुण मिळवत देशात आठवा तर महाराष्ट्रात पहिला क्रमांक मिळवला होता. त्यामुळे यंदाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणासाठी पालिकेने जय्यत तयारी केली आहे. शहरांची संख्याही वाढल्याने स्पर्धा चुरशीची होणार असल्याची चिन्ह आहेत.

नवी मुंबई पालिकेने स्वच्छ सर्वेक्षणासाठी पुरेपूर तयारी केली आहे. पालिका आयुक्त, महापौरांपासून, पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी कामाला लागले आहेत. वसई-विरार महापालिकेचे सर्वेक्षण झाल्यानंतर ७ फेब्रुवारीनंतर नवी मुंबई शहराचे सर्वेक्षण होईल. देशात प्रथम येण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. पूर्ण तयारी झाली आहे, असे आयुक्त रामास्वामी एन यांनी सांगितले. घनकचरा व्यवस्थापनाचे उपायुक्त तुषार पवार यांनी यंदा महाराष्ट्रातील शहराला देशात पहिल्या तीन स्वच्छ शहरांत स्थान मिळाल्यास त्याला २० कोटी तर चौथ्या ते १०व्या क्रमांकांत येणाऱ्यांना १५ कोटींचे बक्षीस राज्य शासन देणार आहे, अशी माहिती दिली.