नवी मुंबई : नवी मुंबईत करोनाबाधितांची वाढती संख्या आणि वाढीचा वेग पाहता नव्याने टाळेबंदी करण्याचे सूतोवाच आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी केले आहेत. ही टाळेबंदी शहरभर नसून ज्या ठिकाणी बाधितांची संख्या वाढीचा वेग जास्त आहे अशाच ठिकाणी म्हणजेच नोडनिहाय असेल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

नवी मुंबई शहरात करोनाबाधितांच्या वाढीचा वेग हा दर २५ दिवसांनी दुप्पट संख्येचा असला तरी आरोग्य व्यवस्थेच्या सीमा तोकडय़ा पडू लागल्या आहेत. सध्या साडेपाच हजाराच्या आसपास करोना रुग्ण संख्या आहे. दोन हजार १२७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

पालिकेकडे केवळ १५००च्या आसपास खाटांची सोय आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांची मदत घेतली जात आहे.

उत्तर मुंबईत अशीच काहीशी परिस्थिती ओढावल्यावर टाळेबंदी लावण्यात आली आहे, त्याच धर्तीवर नवी मुंबईतही लवकरच टाळेबंदी लागू करण्यात येणार आहे. आधीच्या टाळेबंदीप्रमाणेच या काळात नियम लागू असतील.

टाळेबंदी कुठे? 

आग्रोळी गाव, नेरुळ, कोपरखैरणे, ऐरोली, तुर्भे दिघ्यातील चिंचपाडा आणि घणसोली गाव या ठिकाणी टाळेबंदी लागू असून तिचा कालावधी किमान आठ दिवसांचा असेल.