नवी मुंबईत विभागवार आठ भरारी पथके; पालिका आयुक्तांचा निर्णय

नवी मुंबई नवी मुंबई शहरात डेब्रिज माफियांनी धुमाकूळ घातला आहे. याला आळा घालण्यासाठी आवळण्यासाठी आयुक्तांनी शहरात असलेली दोनऐवजी विभागवार अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली एकूण आठ भरारी पथके निर्माण करण्याचे निश्चित केले आहे. पुढील दोन दिवसांत विभाग कार्यालयांतर्गत भरारी पथक तयार करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

आयुक्त रामास्वामी एन. यांनी डेब्रिज टाकणाऱ्यांबाबत अधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्यानंतर काहीसा परिणाम झाला होता. परंतु शहरात अद्यापही छुप्या पद्धतीने डेब्रिज टाकण्याचे प्रकार रात्रीच्या अंधारात सुरूच आहेत. यासाठी ही पथके तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे यापुढे बेकायदा डेब्रिज टाकणाऱ्यांवरून होणारी अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी बंद होणार आहे. प्रत्येक विभाग कार्यालयांतर्गत डेब्रिज आढळल्यास त्याला संबंधित विभाग कार्यालयांतर्गत असणारे डेब्रिज भरारी पथक आणि विभाग अधिकऱ्यांना जबाबदार धरणार असल्याचे संकेत आयुक्तांनी दिले आहेत.

नवी मुंबईत सीवूडस्, नेरुळ, बेलापूर खाडी, एनआरआय खाडीकिनारा, नेरुळ होल्िंडग पॉण्ड, जुईनगर, एमआयडीसीतील विविध मोकळ्या भूखंडांवर डेब्रिज टाकण्यात येत आहे. याची गंभीर दखल घेत आयुक्तांनी १३ अधिकाऱ्यांना नोटिसा पाठवल्या होत्या. कर्तव्यात कसूर केल्यास अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला होता.

नवी मुंबईत रात्रीच्या अंधारात पहाटेच्या वेळी नवी मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या वाशी आणि ऐरोली पुलावरून मोठय़ा प्रमाणात डेब्रिज भरून गाडय़ा पाहायला मिळतात. त्यामुळे शहरात येणाऱ्या डेब्रिज टाकणाऱ्या गाडय़ा कुठे डेब्रिज टाकतात? त्यांनी पालिकेची परवानगी घेतली असते का, असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. शहराच्या विविध भागांत डेब्रिजचे ढिगारे साचले असताना  रोज नव्याने डेब्रिज आणून टाकले जात असताना पालिकेच्या डेब्रिजविरोधी भरारी पथकाला मात्र अद्याप डेब्रिज टाकणाऱ्या गाडय़ा दिसतच नव्हत्या. नवी मुंबई महापलिका हद्दीतून डेब्रिज जाणाऱ्या गाडय़ांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि बेकायदा शहरात कुठेही डेब्रिज टाकणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेचे परिमंडळ-१ मध्ये एक डेब्रिजविरोधी भरारी पथक आणि परिमंडळ-२ मध्ये एक अशी दोन डेब्रिज विरोधी भरारी पथके होती. एका पथकाचे नियंत्रण वाशी विभाग कार्यालयाअंतर्गत तर परिमंडळ-२ मधील भरारी पथकाचे नियंत्रण ऐरोली विभाग कार्यालयांतर्गत केले जात होते. परंतु नवी मुंबईचा विस्तार पाहता भरारी पथकांची संख्या वाढविण्याची मागणी केली जात होती.

तसा प्रस्ताव घनकचरा विभाग उपायुक्त तुषार पवार यांनी आयुक्तांकडे दिला होता. त्यानुसार आयुक्तांनीही तात्काळ कार्यवाही करत विभागनिहाय ८ भरारी पथके निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विभागात कार्यालयांतर्गत पडणाऱ्या डेब्रिजची जबाबदारी वाढणार असून त्यासाठी त्या त्या विभागातील विभाग अधिकारी आणि भरारी पथकाला यापुढे जबाबदार धरले जाणार आहे.

शहरात डेब्रिज भरून नेणारे डंपरकडे डेब्रिज कुठे टाकणार व त्याची परवानगी असणे आवश्यक असते.

नवी मुंबई शहरात डेब्रिज टाकणाऱ्यांवर कारवाईचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. भरारी पथकाला पोलीस व्यवस्थाही करून दिली होती. तरीही कामात हलगर्जीपणा होत असल्याने १३ जणांना नोटिसाही पाठविण्यात आल्या होत्या. यापुढे विभागनिहाय आठ भरारी पथके निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

डॉ. रामास्वामी एन., पालिका आयुक्त