नवी मुंबई : अर्थसंकल्प सादर होण्याअगोदर शहरातील सर्व नागरी कामांना प्राधान्य देणारे पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी आणि नगरसेवक यांचे शनिवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत वाकयुद्ध रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काही नगरसेवकांनी आयुक्तांना संथ आयुक्ताचा शिक्का मारला आहे तर आयुक्तांनी या संथगतीला एकाच सभेत ५२६ कोटीच्या नागरी कामाने उत्तर दिले आहे.

शहरातील नागरी कामाची प्रत्यक्ष पाहणी केल्याशिवाय त्याला मंजुरी न देण्याची आयुक्त डॉ. रामास्वामी यांची कार्यप्रणाली आहे. त्यामुळे प्रभागातील सादर केलेले कामांचे प्रस्ताव लागलीच मार्गी लागत नाहीत. यापूर्वी विभागातील अभियंत्यांना हाताशी धरून ही नागरी कामे झपाटय़ाने केली जात होती त्यामुळे नगरसेवकांचे एक वर्षांत चांगभलं होत होते. नवी मुंबई पालिकेच्या निवडणुकीत प्रत्येक नगरसेवक हा लाखो रुपये खर्च करून निवडून आलेला आहे. त्यामुळे नागरी कामातूनच त्याची वसुली करण्याची पद्धत प्रचलित आहे. यापूर्वी नगरसेवकांनी काम सुचवावेत आणि प्रशासनाने ती तात्काळ पूर्ण करावीत, अशी पद्धत होती. त्याला माजी पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पायबंद घातला. त्यामुळे त्यांच्या दहा महिन्यांच्या कालावधीत नगरसेवक कासावीस झाले होते. प्रभागातील कामांना जणू काही पूर्णविराम मिळाल्याचे चित्र होते. मुंढे यांना योग्य वाटणाऱ्या नागरी कामांनाच चालना मिळत होती. त्यानंतर आलेले डॉ. रामास्वामी यांनी आपल्या कामाची वेगळी पद्धत तयार केली आहे. नगरसेवकांनी सुचविलेले काम तर करणार, पण त्या कामाची आवश्यकता आहे का नाही याची खातरजमा केल्यानंतरच त्या कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यास आयुक्त मान्यता देत आहेत.

हे काम सुरू झाल्यानंतर त्याची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केल्यानंतर त्याची देयके काढण्याचे आदेश दिले जात आहेत. त्यात कामे अंदाजपत्रकानुसार असलेल्या खर्चात करण्याची अट असल्याने टक्केवारीच्या सर्व वाटा बंद झालेल्या आहेत. त्यामुळे आयुक्त काम करीत नाहीत. संथ आहेत. अशी टीका सुरू झाली असून आयुक्तांनी त्याला उत्तर देण्याचे ठरविले आहे.

आयुक्त मौन सोडण्याची शक्यता

अर्थसंकल्पपूर्वीच्या सर्वसाधारण सभेत तर त्यांनी चक्क ५२६ कोटी रुपये खर्चाची कामे मंजुरीसाठी आणली आहेत. याशिवाय छोटी-मोटी साडेचार हजार कोटींची कामे सुरू आहेत. मागील एका सभेत काँग्रेसच्या नगरसेवकाने कामे होत नसल्याचा आरोप केला; पण त्यामागे वेगळे राजकारण असल्याचे नंतर स्पष्ट झाले. त्यामुळे आपल्या संथ गतीच्या शिक्क्य़ावर आयुक्त शनिवारी होणाऱ्या सभेत मौन सोडण्याची शक्यता आहे.