प्रायोगिक तत्त्वावर सुरू; १ हजार जणांच्या हातावर घडय़ाळ

पूनम धनावडे, नवी मुंबई</strong>

पालिकेतील कामचुकार, वेळकाढूपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी ‘जियो फेसिंग यंत्रणे’अंतर्गत अखेर १ हजार कर्मचाऱ्यांच्या मनगटावर ‘स्मार्ट वॉच’ बसविण्यात आले आहे. जीपीएस सिस्टम असल्याने कर्मचाऱ्याची सर्व माहिती उपलब्ध होत असून बेलापूर येथील मुख्यालयातून कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवले जात आहे. प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग सुरू करण्यात आला आहे. चार जणांची टिम हे काम सध्या करीत आहे.

पालिकेतील कामचुकार कर्मचारी, अधिकाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी ‘जिओ फेसिंग व ट्रेकिंग’ प्रणाली अंतर्गत मनगटी घडय़ाळ आणण्याचा निर्णय झाला होता. पालिका प्रशासन विभागात आरोग्य, घनकचरा व्यवस्थापन, उद्यान, शिक्षण, क्रीडा, पाणीपुरवठा, मलनि:सारण, विद्युत विभाग, मोरबे, स्मशानभूमी, विष्णुदास भावे नाटय़गृह, मालमत्ता विभागातील अधिकारी, कर्मचारी असे एकूण तीन हजार तर बाह्ययंत्रणेद्वारे कंत्राटी पद्धतीने काम करणारे एकूण ५ हजार ७०० कर्मचारी आहेत.

सध्या बेलापूर विभागातील १ हजार कर्मचाऱ्यांच्या मनगटावर घडय़ाळ देण्यात आली आहेत, अशी माहिती पालिका अधिकारी राजेंद्र सोनवणे यांनी दिली. त्यांनतर १५ दिवसांत ३ हजार कर्मचाऱ्यांना घडय़ाळ देण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक कर्मचारी ३१५ रुपयेप्रमाणे एकूण ११ कोटी ५१ लाख १ हजार रुपय पालिका खर्च करणार आहे.

या घडय़ाळात जीपीएस सिस्टम, कॅमेरा, वेळ इत्यादी उपलब्ध आहे. कामाच्या वेळेत एकदा घातलेले घडय़ाळ कर्मचाऱ्याला कामाची वेळ संपेपर्यंत काढण्याची परवाणगी नाही. त्या दरम्यानच्या कालावधीत मनगटावरील घडय़ाळ काढल्यास किंवा इतरांना घालायला दिल्यास त्याची माहिती यंत्रणेला लेगच मिळते. किती वेळ काम केले, याची नोंददेखील होत असते. कार्यक्षेत्राबाहेर कर्मचारी गेल्यास त्याला संदेश देऊन सूचित केले जाते. जर कर्मचारी खोटे बोलत असेल तर त्याला घडय़ाळाच्या कॅमेऱ्यातून फोटो काढून पाठवण्यास सांगितले जाते.

सध्या प्रायोगिक तत्त्वावर १ हजार कर्मचाऱ्यांना ही घडय़ाळ देण्यात आलेली आहेत. येत्या १५ दिवसांत आणखीन ३ हजार  घडय़ाळ येणार आहेत. यामुळे कर्मचारी, अधिकारी यांच्यावर कामाच्या वेळी करडी नजर राहणार असून वेळकाढूपणा, कामचुकारपणा करणाऱ्यांवर वचक ठेवता येईल.

– डॉ. रामास्वामी एन, आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका