किल्ले गावठाण चौकात पुलाच्या बांधकामाला वेग

नवी मुंबईत येणाऱ्यांसाठी आकर्षणस्थळ ठरणाऱ्या महापालिकेच्या देखण्या इमारतीचे सौंदर्य आता किल्ले गावठाण उड्डाणपुलाआड झाकोळणार आहे. शहरच्या बऱ्याच मोठय़ा परिसरातून दिसणारी ही इमारत काही महिन्यांत या उड्डाणपुलाआड जाणार आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाच्या एका बाजूला पामबीच मार्ग आहे. समोर आम्रमार्ग व जेएनपीटीकडे जाणारा मार्ग आहे, तर पुढे बेलापूर स्थानकाकडे जाणारा रस्ता आहे. या सर्व मर्गावरून ये-जा करणाऱ्यांचे लक्ष ही आकर्षक इमारत वेधून घेते. सिडकोने महापालिकेला दिलेल्या प्रशस्त भूखंडावर उत्तम नियोजन करून, शहराची ओळख ठरेल, अशी वास्तू उभारण्यात महापालिका शहर अभियंता व अनेकांचे योगदान आहे. या वास्तूचे उद्घाटन शरद पवार व मान्यवरांच्या हस्ते १८ फेब्रुवारी २०१४ ला झाले. पालिकेचा कारभार १० एप्रिल २०१४ला या नव्या मुख्यालयात सुरू झाला. पुण्याहून मुंबईला जाताना पालिका मुख्यालय पाहण्यासाठी अनेक जण पामबीच मार्गावर गर्दी करत. आजही ही इमारत पर्यटक आणि छायाचित्रकारांना भुरळ घालते. या मुख्यालयाला पर्यावरणपूरक वास्तूचे गोल्ड मानांकन मिळाले आहे. येथील उंच ध्वजस्तंभ, सीआरसी डोम याची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही नोंद झाली आहे, मात्र आता ही ऐटबाज वास्तू दूरवर दिसणे कठीण होणार आहे.

या वास्तूच्या बाजूनेच असलेल्या आम्रमार्गावरून पुढे जेएनपीटीकडे जाणाऱ्या-येणाऱ्या मार्गावर किल्ले गावठाण चौकात उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाकडून या उड्डाणपुलाची निर्मिती होत आहे. काही महिन्यांपूर्वी काम सुरू झाले आहे. जयकुमार या कंत्राटदाराने जोमाने कामाला सुरुवात केली आहे. आम्रमार्गावर ५.५ मीटर उंचीचे पाच पिलर उभारण्यात आले असून त्यावर हा उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. ६५० मीटर

लांब व ३२ मीटर रुंद असा हा पूल पालिका मुख्यालयाच्या समोरच होत असल्याने पालिका मुख्यालयाचे सौंदर्य झाकोळले जाणार आहे. या उड्डाणपुलावर ८ लेन असून ४ लेन जाण्यासाठी तर ४ लेन येण्यासाठी असणार आहेत. याच किल्ले गावठाण चौकात उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंना ७ मीटरचे दोन समांतर रस्ते बांधण्यात येणार आहेत. पालिका मुख्यालयाच्या बेलापूर गावच्या दिशेला मोठय़ा प्रमाणात वेगाने काम सुरू झाले असून आता पालिका मुख्यालयाच्या बाजूला असलेल्या समांतर रस्त्यालगतही कामाला सुरुवात झाली आहे. आम्रमार्गावरून होणारी जड वाहनांची वाहतूक, त्यामुळे होणारी सततची वाहतूककोंडी या समस्या सोडविण्यासाठी किल्ले गावठाण चौकात उड्डाणपुलाची निर्मिती होत आहे.

जेएनपीटी मार्गे येणारी तसेच आम्रमार्गावरून जाणारी जड वाहने व इतर वाहने या उड्डाणपुलावरून ये-जा करणार आहेत. बेलापूर, वाशी, नेरूळ या ठिकाणी जाण्यासाठी पुलाखालून मार्ग बनविण्यात येणार आहेत. उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंना समांतर रस्ते असणार आहेत.

पालिका मुख्यालयाच्या बाजूला असलेल्या रस्त्यालगत आणखी एक समांतर रस्ता होणार आहे. ६५० मीटर लांब व ३२ मीटर रुंद असलेला हा उड्डाणपूल पालिका मुख्यालयाजवळ असलेल्या आम्रमार्गावरील बसथांब्यापर्यंत तर जेएनपीटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर खाडीवरील उड्डाणपुलाआधीपर्यंत आहे. एकंदरीतच या उड्डाणपुलामुळे पालिकेच्या मुख्यालयाचे सौंदर्य झाकोळणार असल्याचे दिसते. प्रत्यक्षात या उड्डाणपुलाचे काम १८ मे २०१८पर्यंत पूर्ण होणे आवश्यक होते. कामाला प्रारंभच उशिरा झाल्यामुळे पुढील वर्षीच्या डिसेंबरपूर्वी हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचा प्रयत्न असल्याचे जयकुमार या ठेकेदाराच्या अभियंत्याने ‘लोकसत्ता’ला

सांगितले. या उड्डाणपुलामुळे किल्ले गावठाण चौकातील वाहतूक कोंडी सुटणार असली, तरी पालिका मुख्यालयाचे सौंदर्य झाकोळणार असल्याचे पालिकेच्या अभियंत्यांनी सांगितले.

महापालिका मुख्यालय हा वास्तुकलेचा देखणा नमुना आहे. या वास्तूचे जगभरात कौतुक झाले आहे. वास्तूच्या समोरच उड्डाणपूल येत असल्याने मुख्यालयाच्या दृश्यात थोडासा फरक पडणार आहे, परंतु उड्डाणपूल झाल्यावरही पुलावरून जाणाऱ्यांना या वास्तूचे आणखी सुंदर दृश्य पाहता येणार आहे. उड्डाणपूल झाल्यावरही या वास्तूचे सौंदर्य खुलवण्यासाठी विविध उपाययोजना करता येणे शक्य आहे.

– मोहन डगावकर, शहर अभियंता, नवी मुंबई महापालिका