नव्याने निविदा; आता दहा ठेकेदारांना संधी

नवी मुंबई : शहरातील उद्यानांची २० ठेकेदारांकडून देखभाल नीट होत नसल्याने पालिका प्रशासनाने सर्वसमावेशक ठेका राबविला. मात्र यातही पहिल्याच देयकात गैरप्रकार झाल्याने आता पुन्हा उद्यान देखभालीचे तुकडे पाडण्याची वेळ पालिका प्रशासनावर आली आहे. नव्याने निविदा जाहीर करण्यात आली असून आता दहा गटांत हे काम विभागून देण्यात येणार आहे. १८ जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

नवी मुंबई शहर हे उद्यानांचे शहर म्हणून नावारूपाला येत आहेत. रॉक गार्डन, वंडर्स पार्क या मोठय़ा उद्यानांसह शहरात १८० उद्याने आहेत. त्यांची देखभाल ही पूर्वी २० प्रकल्पग्रस्त ठेकेदारांकडून करण्यात येत होती. मात्र यामुळे प्रत्येक कामाची स्वतंत्र निविदा काढावी लागत असल्याने तसेच कामांत ताळमेळ बसत नसल्याने पालिका प्रशासनाने वर्षभरापूर्वी सर्वसमावेशक ठेका पद्धत राबवत दोन ठेकेदारांना हे काम देण्यात आले. दरम्यान करोना संकट निर्माण झाल्याने शहरातील उद्याने बंद ठेवण्यात आली. मात्र या दोन ठेकेदारांकडून सादर केलेल्या पहिल्याच देयकावरून वाद निर्माण झाला. तीन महिन्यांच्या ८ कोटी १० लाखांच्या देयकांत घोटाळा झाल्याचे समोर आल्यानंतर पालिका प्रशासनाने उद्यान विभागातील ३ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली तर या दोन ठेकेदारांचा ठेका रद्द करीत त्यांना ८ कोटी ३४ लाखांहून अधिकचा दंड आकारला. आता हे प्रकरण न्यायालयात असताना पालिकेने शहरातील उद्यानांच्या देखभालीसाठी नव्याने निविदा जाहीर केली असून वर्षभरापूर्वीच राबविलेली सर्वसामावेशक ठेका पद्धतच रद्द केली आहे. नव्या निविदेत फक्त उद्यान देखभाल दुरुस्तीचे काम असून अभियंता व विद्युत विभागाचे काम समाविष्ट करण्यात आलेले नाही. आता हे काम १० गटांत विभागण्यात आले असून आठ विभाग कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या उद्यानांसाठी आठ ठेकेदार तर पामबीच मार्ग व ठाणे बेलापूर मार्गावरील हिरवळ देखभालीसाठी दोन ठेकेदार निवडण्यात येणार आहेत. त्यांच्याकडून उद्याने व इतर मोकळ्या जागांवरील सुभोशीकरण असे एकूण १४.५० लाख चौ.मी.ची देखभाल दुरुस्तीची कामे करवून घेण्यात येणार आहेत.

प्रकल्पग्रस्त ठेकेदार नाराजच

प्रकल्पग्रस्त ठेकेदारांकडून हे काम काढून घेतल्याने त्यांच्यात तीव्र नाराजी होती. या नाराजीतूनच हा उद्यान घोटाळा समोर आला असून आता पुन्हा या प्रकल्पग्रस्त ठेकेदारांना हे काम मिळणार आहे. मात्र पूर्वीच्या २० ठेकेदारांएवजी दहा ठेकेरादांना काम मिळणार असल्याने त्यांच्यात नाराजी आहे. तसेच  प्रति चौ.मीटरचा दर अधिक आहे. सुरुवातीला ११.६५ प्रति.चौ.मीटरने काम करत होतो. तोच दर आता १३ रुपये होईल त्यामुळे आयुक्तांची भेट घेणार असल्याचे प्रकल्पग्रस्त ठेकेदार गजानन पाटील यांनी सांगितले.

नवी मुंबई महापालिकेतील उद्यान देखभाल दुरुस्तीच्या कामाबाबत निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून १८ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. १० गटांत हे काम करण्यात येणार असून समाविष्ट अटीशर्तीनुसार काम देण्यात येणार आहे. यामध्ये प्रति चौरस दराने काम देण्यात येणार असून यात पारदर्शकता ठेवण्यात आली आहे.

– अभिजीत बांगर, आयमुक्त, महापालिका