नवी मुंबई : मुस्लिम धर्मियांकडून  बकरी ईद हा सण १ ऑगस्ट रोजी साजरी होत आहे. या निमित्ताने बकऱ्यांची कुर्बानी  देण्याची प्रथा आहे. मात्र, करोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यंदा बकरी ईद साध्या पद्धतीने साजरी करण्याच्या सूचना राज्य शासनाच्या वतीने करण्यात आल्या आहेत. याच वेळी नवी मुंबई महापालिकेने काही नियमावली जाहीर केली आहे.

संसर्गजन्य परिस्थितीमुळे सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यानुसार बकरी ईदची नमाज मस्जिद वा अथवा सार्वजनिक ठिकाणी साजरी न करता घरीच नमाज अदा करावी, जनावरांचे बाजार बंद राहतील. नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची झाल्यास ऑनलाइन पद्धतीने वा दूरध्वनीवरून जनावरे खरेदी करावीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

याशिवाय नागरिकांनी प्रतिकात्मक ्रकुर्बानीवर भर द्यावा. पालिका हद्दीतील प्रतिबंधित क्षेत्रांत सध्या लागू असलेले निर्बंध कायम राहणार आहेत. त्यात कोणतीही शिथिलता आणली जाणार नाही, असे नमूद करण्यात आले आहे.

कत्तलखान्यांना परवानगी नाही

या सणाला कोणीही गर्दी करू  नये किंवा एकत्र जमू नये. पालिकेने लागू  केलेल्या नियमांचे पालन करणे सर्वासाठी बंधनकारक असेल. पालिकेच्या वतीने याआधी तात्पुरत्या कत्तलखान्यांना परवानगी दिली जात होती. मात्र, यावर्षी ती परवानगी देण्यात येणार नाही.