खाटा रिकाम्या असल्याने प्रवेश; पाच टक्के रुग्ण इतर शहरांतील

नवी मुंबई : शहरातील करोना रुग्णसंख्या कमी झाल्याने प्राणवायू व सर्वसाधारण रुग्णशय्या मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे पालिकेने शेजारधर्म पाळत आता शहराबाहेरील करोना रुग्णांना उपचारासाठी या रुग्णशय्या उपलब्ध करून दिल्या आहेत. ही संख्या पाच टक्के रुग्णांची आहे. यात काही रुग्णांना अतिदक्षता व जीवरक्षक प्रणाली देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

नवी मुंबईतील खासगी रुग्णालयात शहराबाहेरील रुग्णांची संख्या वाढू लागल्याने मागील महिन्यात पालिकेने खासगी रुग्णालयातील ८० टक्के रुग्णशय्या ताब्यात घेऊन त्यावर पालिकेच्या वतीने शिफारस केलेल्या रुग्णांना प्रवेश देण्याचा आदेश सर्व खासगी रुग्णालयांना कळविला होता. त्यामुळे शहराबाहेरील रुग्णांची संख्या हळूहळू कमी होऊन शहरातील रुग्णांना रुग्णशय्या उपलब्ध होऊ लागल्या आहेत.  मागील काही दिवसांपासून पालिका क्षेत्रातील रुग्णांची संख्या कमी होत असून ती दोनशे ते अडीचशे अशी सरासरी आहे. मागील माहिन्यात एका दिवसात हा आकडा पंधराशेपर्यंत गेला होता. त्यावेळी रुग्णशय्यांसाठी प्रतीक्षा यादी तयार झाल्याचे चित्र होते. सध्या शहरातील सहाशे अतिदक्षता विभागातील रुग्णशय्या ह्य़ा भरलेल्या आहेत तर काही प्रमाणात जीवरक्षक प्रणाली देखील व्यापून गेलेल्या आहेत. मात्र काळजी केंद्रातील सर्वसाधारण रुग्णशय्या व प्राणवायू रुग्णशय्या दोन हजारांपर्यंत खाली आहेत. अशा वेळी पनवेल, उरण, कल्याण डोंबिवली. ठाणे येथील काही रुग्णांना दाखल करून घेतले जात आहे. यात अतिदक्षता रुग्णशय्यांसाठी देखील प्रवेश दिला जात असून कल्याण डोंबिवली येथील एका महिलेला डी. वाय. पाटील रुग्णालयात अतिदक्षता रुग्णशय्या उपलब्ध करून देण्यात आली होती, तर पनवेल पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या विनंतीवरून त्यांच्या हद्दीतील एका रुग्णाची आर्थिक स्थिती खालावल्याने तेरणा येथून वाशी येथील काळजी केंद्रात हलविण्यात आले होते. शहराबाहेरील रुग्णांवर नियंत्रण मिळविणारी पालिका आता माणुसकीत धर्म पाळताना शहराबाहेरील काही रुग्णांसाठी पालिकेच्या रुग्णशय्या उपलब्ध करून देत आहे. करोना रुग्णांवरील उपचारासाठी जिल्हा, शहर, अशा मर्यादा खर्चाच्या दृष्टीने घालण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे शहराबाहेरील रुग्णांवर पालिका रुग्णालयात उपचार केल्यास त्यावरील खर्चाचा मुद्दा आरोग्य विभागाच्या लेखा परीक्षणात येऊ शकतो,  त्यामुळे पालिकेने हा शेजारधर्म पाळताना लेखा परीक्षणाचे भान ठेवले आहे.

शहराबाहेरील रुग्णांवर उपचार करताना काही मर्यादा आहेत पण अशा साथीच्या काळात काही नियम बाजूला ठेवून माणुसकी धर्म पाळावा लागत आहे. त्यामुळे आजूबाजूचे करोना रुग्ण आल्यास त्यांना खासगी रुग्णालयात रुग्णशय्या मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. दिल्लीहून काही रुग्ण नवी मुंबईत उपचारासाठी आलेले आहेत. मात्र ज्यांची आर्थिक स्थिती कमकुवत आहे, त्या रुग्णांचा उपचारासाठी सहानुभूतीने विचार केला जात आहे. ही संख्या जास्त नाही पण आमच्या दृष्टीने भेदभाव न करता शक्य असल्यास उपचार देणे महत्त्वाचे आहे.

अभिजीत बांगर, आयुक्त, नवी मुंबई पालिका