नवी मुंबई पालिकेचा अठरावा प्रदूषण अहवाल प्रसिद्ध झाला आहे. नेहमीच येतो पावसाळा, त्याप्रमाणे हा अहवाल दरवर्षीप्रमाणे प्रसिद्ध  झाला आहे. हा अहवाल नवी मुंबईकरांच्या डोळ्यात धूळफेक करणारा असल्याची चर्चा आहे. त्याचे कारणही तसेच आहे. केंद्रीय हरित लवादाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात राज्यातील काही शहरांना प्रदूषणकारी शहरे म्हणून नावे ठेवली आहेत. त्यात नवी मुंबईचा चौथा क्रमांक लागतो. पहिल्या क्रमांकावर तारापूर आहे. राज्य शासनाने दोन वर्षांपूर्वी जाहीर केलेल्या एका आकडेवारीनुसार नवी मुंबईत २९ टक्के प्रदूषण असल्याचे विधानसभेत जाहीर केले आहे. देशातील दोन संस्था हे शहर प्रदूषणकारी असल्याचे जाहीर करतात आणि नवी मुंबई पालिका आपले हे बिरुद झाकण्यासाठी शहरातील प्रदूषण कमी झाल्याचा दावा करते हे आश्र्चयजनक आहे. देशात दुसऱ्या क्रमांकाचे राहण्यायोग्य शहर म्हणून या शहराचा केंद्रीय नगरविकास विभागाने गौरव केल्यानंतर तर पालिकेला आसमान दोन बोटे उरले होते. नवी मुंबई पालिकेला स्वच्छतेचे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. घनकचरा व्यवस्थापनात या शहराला अव्वल क्रमांक देण्यात आला आहे. त्या अगोदर हे शहर स्वच्छ भारत अभियानात तिसऱ्या क्रमांकावर होते. त्यामुळे पहिल्या क्रमांकावर येण्यासाठी पालिकेने चांगला अभ्यास केला होता, पण इंदौरसारख्या शहराने यात बाजी मारली. स्वच्छता आणि प्रदूषणाचा तसा काही संबंध नाही. शहरात होणारे प्रदूषण हे जल, जमीन आणि हवा तीन प्रकारात मोडणारे आहे. नवी मुंबई पालिकेने तयार केलेल्या अहवालात पर्यावरण, नागरी आणि जीवनशैली कशी आहे यावर तयार केला आहे. त्यात नवी मुंबईतील नागरी सुविधा इतर शहरांपेक्षा चांगली असून जीवनशैली उंचावलेली आहे, मात्र याचा अर्थ पर्यावरण सुधारलेले आहे असे म्हणता येणार नाही.

नवी मुंबई पालिका क्षेत्रात पाच हजारापेक्षा जास्त कंपन्या असून त्यात आजही सातशे ते आठशे छोटे-मोठे रासायनिक कारखाने आहेत. मफतलाल समूहाचा पील, नोसिल आणि स्टॅण्डर्ड हे तीन रासायनिक कारखाने बंद होऊन त्या ठिकाणी रिलायन्स समूहाचे कॉर्पोरेट कार्यालय आले म्हणजे प्रदूषण बंद झाले असे म्हणता येणार नाही. त्याऐवजी काही कारखाने आजही जल, जमीन व हवेचे प्रदूषण निर्माण करीत आहेत. त्यामुळे डोंगरातून खाडीकडे वाहणाऱ्या पावसाळी नाल्यात रासायनिक पाणी अनेक वेळा आढळून आले आहे. कोपरखैरणे येथील पावसाळी नाल्याची दुर्गधी असह्य होत असल्याने येथील रहिवाशांनी अनेक वेळा तक्रार केलेली आहे. हिवाळ्यात वातावरणातील थंड हवेचा फायदा घेऊन अनेक कारखाने रासायनिक वायू हवेत सोडत असल्याने शहरातील नागरिकांना दम्याचा त्रास जाणवत आहे. त्यामुळे सकाळ संध्याकाळ या भागातील वातावरणात धुके पसरल्याचा भास होतो. ते धुके नसून प्रदूषणाची चादर पांघरल्याचे एव्हाना नवी मुंबईकरांना समजून चुकले आहे. त्यामुळे हिवाळ्यात अनेक नागरिक सकाळी फिरण्याचे टाळत असून खोकला, सर्दी आणि श्वसनाचे त्रास होत असल्याची आजही तक्रार आहे. या प्रदूषणाला मुंबईतील देवणार व कांजुरमार्ग येथील क्षेपणभूमी हातभार लावत असून नवी मुंबईत हे प्रदूषण व दुगर्र्धी पोहचत आहे. हे सर्व दरवर्षी घडणारे प्रकार असताना नवी मुंबई पालिका शहरातील प्रदूषण कमी होत असल्याचा दावा कोणत्या आधारावर करीत आहे, हा खरा प्रश्न आहे.

कोपरखैरणे येथील हवा गुणवत्ता केंद्र गेले सात महिने बंद असताना येथील ओझोन कसा मोजता आला. हाच प्रकार वाशी व तुर्भे येथील गुणवत्ता केंद्राचा आहे. प्रदूषण अहवाल तयार करण्याचे काम एखाद्या संस्थेला दिल्यावर पालिकेची जबाबदारी संपते का? कोणत्या निकषावर या शहारात प्रदूषण नाही असे छातीठोकपणे सांगता येत आहे. एखादी समस्या स्वीकारली की त्यावर उपाययोजना करणे सोपे, मात्र प्रदूषण नाही, ते कमी होत आहे, असा दरवर्षी दावा केला की पालिकेचे अधिकारी हात झटकून मोकळे होत आहेत. पालिकेच्या गेल्या वर्षीच्या अहवालाची तुलना केली तरी यंदाचा अहवाल सारखा वाटेल असे चित्र आहे. शहरातील पश्चिम डोंगराच्या रांगेत असलेल्या दगडखाणी काही अंशी बंद झाल्या असल्या, तरी ज्या दगडखाणींचा भाडेपट्टा संपलेला नाही त्या दगडखाणी आजही सुरू आहेत. त्या दगडखाणींचे काही अंशी आजही प्रदूषण आहे. याशिवाय शहरातून ठाणे-बेलापूर, महापे-शिळफाटा, शीव-पनवेल, बेलापूर-जेएनपीटी असे महामार्ग जात आहेत. त्यावरून दिवसागणिक लाखो वाहने धावत आहेत. वाहनांचे प्रदूषण हे सर्वाधिक मानले गेले आहे. त्यामुळे या एकाच कारणास्तव नवी मुंबईत प्रदूषण आहे, हे कोणीही सांगू शकणार आहे.

बेलापूरच्या जवळ असलेली तळोजा एमआयडीसी रासायनिक कारखान्यासाठी प्रसिद्ध आहे. काही महिन्यापूर्वी येथील भटकी कुत्री देखील रंगीबेरंगी झाली होती इतके या ठिकाणी प्रदूषण आहे. तळोजा एमआयडीसीचा परिणाम नवी मुंबईला भोगावा लागत आहे. हवेतील प्रदूषण पसरताना ते तळोजा आणि नवी मुंबई असा भेदभाव करण्याचा प्रश्न येत नाही. याच परिसरात नवी मुंबई विमानतळाचे काम प्रगतीपथावर आहे. तेथे एक पूर्ण डोंगराची उंची आठ मीटपर्यंत कमी केली जात आहे. तीन कोटी टनापेक्षा जास्त माती या भागातून उत्खनन होत असून सुरुंग स्फोट होताना मोठय़ा प्रमाणात हवेतील प्रदूषण वाढले आहे. त्यामुळे रासायनिक कारखाने, दगडखाणी, विमानतळ, वाहने, जेएनपीटी विस्तार यांचा एकत्रित अभ्यास केला तर नवी मुंबई, पनवेल, उरण येथील प्रदूषण कमी होण्याऐवजी वाढण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे प्रदूषण कमी झाल्याचा आव आणण्यापेक्षा पालिकेने सद्य:स्थिती स्वीकारून काही उपाययोजना करणे अपेक्षित आहे.