घोटाळेबाज भाजप ही पुस्तिका शिवसेनेने प्रसिद्ध केली आणि भाजप-शिवसेनेतील वाद अधिकच पेटला. त्याच्या झळा थेट नवी मुंबईतील महापौर निवडणुकीला लागल्या. हे पद काबीज करण्यासाठी गेले तीन महिने जंग जंग पछाडणारे विरोधी पक्ष नेते विजय चौगुले यांचे स्वप्न या झळांत भस्मसात झाले. आता महापौरपदाच्या निवडणुकीतील हवा निघून गेली असली, तरीही उपमहापौरपदासाठी काँग्रेसच्या दोन उमेदवारांनी अर्ज भरल्यामुळे निवडणुकीतील उत्कंठा कायम आहे.

नवी मुंबईची महापौर, उपमहापौर निवडणूक गुरुवारी होत आहे. भाजपने ऐन वेळी शिवसेनेला साथ न देण्याची भूमिका जाहीर केल्याने या निवडणुकीतील हवा निघून गेली आहे, मात्र या निमित्ताने झालेला घोडेबाजार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रचनेला धक्का लावणारा ठरला आहे. गेले दोन महिने या निवडणुकीमुळे अंतर्गत राजकारण ढवळून निघाले होते. त्याला कारणही तसेच आहे.

अडीच वर्षांपूर्वी झालेल्या पालिकेच्या पाचव्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. एखाद्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही की घोडेबाजार अटळ असतो. पाच अपक्ष नगरसेवकांच्या कुबडय़ा घेऊन राष्ट्रवादीला पालिकेतील सत्ता टिकवण्याची वेळ आली. त्या वेळी अपक्षांचा भाव वधारला होता. त्यांना लक्ष्मीदर्शनाबरोबरच चांगल्या पदाचे आमिषदेखील दाखविण्यात आले होते. यात राष्ट्रवादीने बाजी मारली. निकाल लागल्याबरोबर पाच अपक्षांची मोट बांधून त्यांना अज्ञातस्थळी नेण्यात आले होते. त्या वेळीही हे पाच अपक्ष हाताला लागावेत यासाठी शिवसेनेने जंग जंग पछाडले होते. त्या निवडणुकीत माजी मंत्री गणेश नाईक यांचा मुत्सद्दीपणा दिसून आला. त्यामुळे राज्यातील अनेक पालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा राष्ट्रवादीच्या हातातून निसटत असताना नवी मुंबईसारखी श्रीमंत पालिका टिकविण्यात राष्ट्रवादीला यश आले होते. त्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट सर्वत्र पसरली असताना ही एक पालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात राहिल्याने त्याचे कौतुक केले गेले.

यंदा राष्ट्रवादीतील काही नाराज शिवसेनेच्या संपर्कात होते. त्यांनी आपले नगरसेवकपद पणाला लावण्याची तयारी ठेवली होती. प्रभागात कामे न होणे, संवादाचा अभाव, निवडणुकीत झालेला खर्च वसूल न झाल्याने आलेले नैराश्य, शिवसेना व भाजप या सत्ताधारी पक्षांचे आकर्षण यामुळे ही नाराजी होती.

दिघा येथील राष्ट्रवादीचे तीन नगरसेवक तर शिवसेनेच्या कंपूत बिनधास्त फिरत होते. दिघा येथील बेकायदा बांधकामांवर झालेल्या कारवाईत राष्ट्रवादीने केलेला असहकार आणि नवीन गवते यांच्यावर झालेल्या फौजदारी कारवाईत त्यांना न केलेली मदत ही या नाराजीची प्रमुख कारणे होती. त्याला शिवसेनेने पर्यायी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी फुंकर घातली आणि गवते कुटुंबाला हवी ती मदत उपलब्ध करून दिली. त्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची मदत महत्त्वाची मानली गेली. त्यामुळे हे तीन नगरसेवक शिवसेनेला साथ देणार हे जवळजवळ नक्की झाले होते.

यात वाशीतील राष्ट्रवादीचे एक ‘वैभव’ असलेले माजी नगरसेवकही राष्ट्रवादीवर कमालीचे नाराज आहेत. त्यांची पत्नी सध्या वाशीच्या उच्चभ्रू वसाहतीचे प्रतिनिधित्व करीत आहे. प्रभागातील कामे होत नसल्याची अनेक वेळा तक्रार करूनही त्यांना सापत्न वागणूक दिली जात असल्याने त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकण्याची तयारी सुरू केली आहे. तुर्भे येथील एका दबंग नगरसेवकाचे एमआयडीसीतील उद्योगधंदे बंद करण्यात नाईक कुटुंबातील सदस्याने हातभार लावल्याने त्यांनीही राष्ट्रवादीपासून लांब जाण्याचे ठरविले होते. अशा प्रकारे पाच-सहा नगरसेवक आपल्या पदावर तुळशीपत्र ठेवून शिवसेनेला मदत करणार होते. त्यामुळे महापौरपदाचे संभाव्य उमेदवार चौगुले यांना विजयाच्या आशा निर्माण झाल्या होत्या.

चौगुले निवडणुकीत उतरणार असल्याने या घोडेबाजाराला जास्त ऊत आला. राष्ट्रवादीच्या या नाराज गटाच्या जोरावर सत्तास्वप्नांचे इमले बांधताना, भाजपच्या सहा नगरसेवकांनाही गृहीत धरले गेले होते. त्यांच्याही गरजा पूर्ण करण्याचे काम केले जात होते पण त्यांच्या पाठिंब्यासाठी भाजपच्या राज्यस्तरीय नेतृत्वाशी एकदाही चर्चा केली गेली नाही. त्यातच शिवसेनेच्या काही नेत्यांनी काढलेली ‘घोटाळेबाज भाजप’ ही पुस्तिका भाजप नेत्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली. या पुस्तिकेचे पहिले पडसाद नवी मुंबईच्या महापौर निवडणुकीत उमटले. महापौरपदासाठी शिवसेनेला पाठिंबा न देण्याचा निर्णय भाजपने घेतला.  अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशीच ही पुस्तिका प्रकाशित झाली आणि चौगुले यांचे स्वप्न भंगले.

चौगुले यांना यापूर्वी पक्षाने एकदा खासदारकी दोनदा आमदारकीची उमेदवारी दिली आहे. त्यात त्यांचा पराभव झाला होता. ही निवडणूक लढण्यापूर्वीच त्यांचा पराभव झाल्याने हा त्यांना तिसरा मोठा फटका बसला आहे. भाजपने हात वर केल्याने पाठिंबा देताना किती नगरसेवकांची जमवाजमव झाली आहे यावर लक्ष ठेवून असणाऱ्या काँग्रेसनेही पाठिंब्याबाबतची भूमिका बदलली आणि चौगुले यांचे व शिवसेनेचे नवी मुंबईच्या महापौरपदाचे स्वप्न अधुरे राहिले.

भाजप आणि काँग्रेसची साथ न मिळाल्याने महापौर निवडणुकीची केवळ औपचारिकता शिल्लक आहे. चौगुले यांना गप्प बसविण्यात आल्याने राष्ट्रवादीच्या पथ्यावर ही निवडणूक पडली, मात्र राष्ट्रवादीने ५७ नगरसेवकांची तयारी केली होती. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक जे. डी. सुतार गुरुवारी या शहराचे नवीन महापौर होतील. या पदानंतर उपमहापौरपदाची निवडणूक होणार असून ती चुरशीची ठरणार आहे.

काँग्रेसचे उपमहापौरपदाचे उमेदवार म्हात्रे यांच्या उमेदवारीविरोधात पक्षाचे येथील अध्यक्ष दशरत भगत यांनीच बंडखोरी केली आहे. त्यांनी त्यांची पत्नी वैजयंती भगत यांनी अर्ज भरला आहे. या भगत यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते. त्यामुळे राष्ट्रवादीचे नगरसेवक भगत यांना मदत करणार असे दिसून येते. असे झाल्यास काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराला दगाफटका होण्याची शक्यता आहे. इथूनच राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नवीन संघर्षांला सुरुवात होणार आहे. राष्ट्रवादी कोणाला पाठिंबा देते हे गुरुवारी समजणार आहे.

काँग्रेसने योग्य भूमिका घेत भगत, म्हात्रे या दोन प्रतिस्पर्धीना बाजूला सारून तिसऱ्याच नगरसेवकाला उमेदवारी दिली असती तर हा पेच निर्माण झाला नसता, मात्र आता या उपांत्य फेरीतील निवडणुकीसाठी घोडेबाजार सुरू आहे. त्यामुळे यंदाचे सरते वर्ष नगरसेवकांच्या घोडेबाजाराला चालना देणार आहे.

१२ ते १३ कोटींची उधळण

शिवसेनेचा महापौर व्हावा यासाठी मातोश्रीने कोणतेही प्रयत्न केले नाहीत. या सर्व रणधुमाळीत दोन प्रमुख पक्षांकडून १२ ते १३ कोटींचा घोडेबाजार झाल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीतील नाराज नगरसेवक, अपक्ष, काँग्रेस आणि भाजप नगरसेवकांची या निमित्ताने चांदी झाल्याचे बोलले जाते. आलेल्या लक्ष्मीत काही जणांनी जमीन, जुमला, सोने, खरेदी केल्याची आणि कामगारांना बोनसही वाटल्याची चर्चा आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत घोडेबाजाराला लगाम बसावा यासाठी जाहीर करण्यात आलेली खुली निवडणूक नामधारीच ठरली आहे.

काँग्रेसमध्ये वाद

काँग्रेसच्या दहा नगरसेवकांचा पाठिंबा मिळावा, यासाठी राष्ट्रवादीने जंग जंग पछाडले होते. त्या पक्षाने माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांच्या पत्नीला अधिकृत उमेदवारी दिली आहे. म्हात्रे हे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. चव्हाण मुख्यमंत्री असताना म्हात्रे यांच्या गोठवलीसारख्या आडवळणाच्या गावात दोन वेळा स्नेहभोजनासाठी आले होते. यावरून या दोघांचे संबंध लक्षात येतात. म्हात्रे यांना चव्हाण उपमहापौरपदाची उमेदवारी देतील हे गृहीत धरण्यात आले होते, मात्र ही उमेदवारी देताना १० नगरसेवकांचे मत जाणून घेण्यात आले नसल्याचे स्पष्ट दिसून येते.