दारावेतील स्वप्नसाकार इमारतीसंदर्भात पालिकेचा निर्णय, रहिवाशांचे हाल

नवी मुंबई नवी मुंबईतील दारावे गावातील स्वप्न साकार इमारतीच्या दोन मजल्यांचे स्लॅब कोसळून तिघे जखमी झाल्यानंतर इमारत सील करण्यात आली आहे. संरचनात्मक परीक्षण झाल्याशिवाय इमारतीत राहण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे गुरुवारी पालिकेने स्पष्ट केले. रहिवाशांची एक दिसापुरती रात्र निवारा केंद्रात राहण्याची सोय करण्यात आली होती. त्यामुळे आता पुढे काय, असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे.

स्वप्नसाकार इमारतीचे बांधकाम १९९६मध्ये करण्यात आले होते. इमारत २००० साली बांधून पूर्ण करण्यात आली. इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे आहे काय, सध्या तिची स्थिती कशी आहे, याच्या परीक्षणाचा अहवाल आल्याशिवाय रहिवाशांना आत जाऊ न देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. तिथे राहणाऱ्यांचे सर्व जीवनावश्यक साहित्य, मुलांचे कपडे, पुस्तके, महत्त्वाची कागदपत्रे सारेच घरात अडकल्यामुळे आता पुढे काय करायचे काय असा प्रश्न या इमारतीतील कुटुंबांना पडला आहे.

इमारतीत राहण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. रहिवाशांनीच संरचनात्मक परीक्षण करून द्यायचे आहे. पालिकेला अहवाल सादर केल्यानंतर राहण्याची परवानगी द्यावी की नाही, याचा निर्णय पालिका घेईल. इमारतीचा वीज व पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

– शशिकांत तांडेल, विभाग अधिकारी, बेलापूर.