एकाही रुग्णावर उपचार नाही; करोनाकाळात पालिकेच्या शिफारशी नाकारल्या
नवी मुंबई : वाशी येथील फोर्टिज हिरानंदानी रुग्णालयाने करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर नवी मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाने शिफारस केलेला एकही कोविड किंवा नॉन कोविड रुग्ण दाखल करून न घेतल्याने पालिकेने या रुग्णालयाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
शहराला सुपर स्पेशालिटी रुग्णालयीन सेवा, सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी नवी मुंबई पालिकेच्या सार्वजनिक रुग्णालयातील एक लाख वीस हजार चौरस फूट क्षेत्रफळ हिरानंदानी हेल्थ केअर प्रा.लि. या वैद्यकीय कंपनीला २५ वर्षांच्या भाडेतत्त्वावर नाममात्र भाडय़ाने दिले आहे. त्याबदल्यात या रुग्णालयाने शहरातील वर्षांला ८०० गरीब गरजू रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा करार केला आहे. मात्र या रुग्णालयाने मागील नऊ महिन्यांत एकाही रुग्णावर उपचार केले नसल्याने ही नोटीस जारी करण्यात आली आहे.
नवी मुंबई पालिकेचे वाशी, सेक्टर नऊ येथे १९ वर्षांपूर्वी पाच मजली सार्वजनिक रुग्णालय उभारले आहे. पालिकेच्या वैद्यकीय सुविधा पाहता शहरातील गरीब, गरजू नागरिकांना वेळप्रसंगी सुपर स्पेशालिटी रुग्णालय उपलब्ध व्हावे यासाठी या इमारतीतील चौथ्या व पाचव्या मजल्याचे एक लाख वीस हजार चौरस फूट क्षेत्रफळ हे वैद्यकीय साखळी उभारणाऱ्या हिरानंदानी हेल्थ केअर यांना भाडेतत्त्वावर दिले आहे. या रुग्णालयाने नंतर फोर्टिज या देशभर वैद्यकीय जाळे विणणाऱ्या कंपनीबरोबर सामंजस्य करार करून पालिकेच्या सार्वजनिक रुग्णालयाच्या पश्चिम बाजूस अद्ययावत रुग्णालय उभारले आहे.
या रुग्णालयासाठी सार्वजनिक रुग्णालयाचा एक भाग देताना शहरातील गरीब व गरजू रुग्णाांना दहा टक्के रुग्णशय्या उपलब्ध करून देण्याचा करार झाला आहे. त्यानुसार पालिकेचा आरोग्य विभाग शिफारस करणाऱ्या गरजवंत रुग्णाला फोर्टिज हिरानंदानी रुग्णालयात औषधे वगळता मोफत सेवा दिली जाते. मात्र मार्चपासून सुरू झालेल्या कोविड साथरोगानंतर फोर्टिज हिरानंदानी रुग्णालयाने पालिकेने शिफारस केलेल्या एकाही रुग्णाला दाखल करून घेतलेले नाही. नवी मुंबई पालिकेचे सार्वजनिक रुग्णालय तात्काळ सेवा म्हणून कोविड रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला होता. त्यामुळे या रुग्णालयात केवळ कोविड रुग्ण दाखल होत होते. फोर्टिज हिरानंदानी रुग्णालयानेही कोविड रुग्ण कक्ष सुरू केले होते. याच काळात या रुग्णालयात नॉनकोविड कक्षदेखील सुरू ठेवण्यात आला होता. नवी मुंबई पालिकेने शिफारस केलेल्या एकाही रुग्णाला या रुग्णालयाने दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यामुळे पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या आदेशाने या रुग्णालयाला आरोग्य विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
कराराचा भंग
वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयाचा हिस्सा असलेल्या हिरानंदानी रुग्णालयाने करोनाकाळात पालिकेच्या एकाही कोविड अथवा नॉनकोविड रुग्णाला प्रवेश दिलेला नाही. हा पालिकेबरोबर केलेल्या कराराचा भंग आहे. त्यामुळे या रुग्णालयीन प्रशासनाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
मालमत्ता देऊन उपयोग काय?
करारानुसार फोर्टिज हिरानंदानी रुग्णालयाने दहा टक्के रुग्णशय्या याप्रमाणे वर्षांला ८०० रुग्णशय्या उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. मात्र गेल्या नऊ महिन्यांत या रुग्णालयाने एकाही रुग्णाला प्रवेश न दिल्याने पालिकेची मालमत्ता या रुग्णालयाला नाममात्र भाडय़ाने देऊन उपयोग काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 8, 2020 1:27 am