नवी मुंबई : केंद्र सरकारचे स्वच्छ भारत अभियानाअंर्तगत येणारे सर्वेक्षण पथक कोणत्याही क्षणी शहरात येण्याची शक्यता लक्षात घेऊन पालिकेने स्वच्छतेबाबत जोर मारला आहे. त्यामुळे पहाटे पाच वाजल्यापासून पालिकेचे अधिकारी कर्मचारी रस्त्यावर उतरत असून सार्वजनिक शौचालयातील चोरींमुळे अधिकारी हैराण झाले आहेत. गेल्या काही दिवसात शहरातील शौचालयातून २५ शौच कूप, २०० नळ, आणि १५०एलईडी टय़ूबलाईट गायब झालेले आहेत. त्यामुळे चोरीला गेलेल्या वस्तूंच्या जागी नवीन साहित्य बसविण्याताच अधिकाऱ्यांचा वेळ जात आहे.

केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियानाचे सर्वेक्षण जाहीर केले आहे. यंदा या सर्वेक्षणात साडेसात हजारापेक्षा जास्त शहरांनी भाग घेतला आहे. गेली तीन वर्षे मध्य प्रदेश मधील इंदौर शहर अव्वल येत आहे. या शहरातील नागरीकांचा सक्रीय सहभाग हे या यशामागील गमक आहे. नवी मुंबईतील नागरीक याबाबत उदासीन आहेत. या सर्वेक्षणात यशस्वी होण्यासाठी पालिका प्रशासनाने जोर मारला असून अधिकारी व कर्मचारी पहाटे पाच वाजल्यापासून स्वच्छता करीत आहेत तर आयुक्त डॉ. रामास्वामी पहाटे सहा वाजता या स्वच्छतेची पाहणी करीत आहेत. नवी मुंबई पालिकेने गेल्या वर्षी संपूर्ण शहरात साडेपाचशे सार्वजनिक शौचालये बांधलेली आहेत. नागरिकांना उघडय़ावर शौच किंवा मूत्र विर्सजन करु नये हा त्यामागील उद्देश आहे. ई-टॉयलेटद्वारे ही यंत्रणा अधिक सक्षम केली आहे. मात्र या सार्वजनिक शौचालमधून होणारी दैनंदिन शौच कूप, नळ, लाद्यास दरवाजे, विद्युत दिवे यांच्या चोरीने पालिका कर्मचारी व अधिकारी हैराण झालेले आहेत. या शौचालयाच्या देखरेखीसाठी २४ तास सुरक्षारक्षक किंवा कर्मचारी नेमणे शक्य नाही. त्यामुळे पालिका आयुक्तांनी या शौचालयाची स्वच्छता  पाहणाऱ्या संस्थांनाच वाढीव मोबदला देण्याची निर्णय घेतला आहे; पण हा प्रस्तावही रखडला आहे. त्यामुळे सार्वजनिक शौचालयातील हात की सफाई आजही सुरू आहे. यावर होणारा खर्चही पाण्यात जात असून स्वच्छ भारत अभियानाला हे चोरटे अशा प्रकारे हरताळ फासत आहेत.

नवी मुंबई पालिकेने स्वच्छ भारत अभियानात अव्वल येण्यासाठी नेहमीच प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. त्यामुळे यापूर्वी पालिका चांगले स्थान पटकवू शकली आहे. मात्र सार्वजनिक शौचालयातील ही चोरी या प्रयत्नांना खो घालत आहे. या चोरीवर कायम स्वरुपीय उपाययोजना केली जाणार आहे.

-संजय देसाई, कार्यकारी अभियंता, पालिका