सर्वस्वी जबाबदारी प्रभाग अधिकाऱ्यांवर

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नवी मुंबई : स्वच्छ भारत अभियान सर्वेक्षणाच्या निमित्ताने करोनाकाळात ठप्प झालेल्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावरील कारवाईला पालिका प्रशासनाने पुन्हा वेग दिला आहे. दोन प्रभाग बैठकीत प्लास्टिकमुक्तीचा नारा देण्यात आला आहे. शहरातील प्लास्टिकमुक्तीची सर्वस्वी जबाबदारी ही प्रभाग अधिकाऱ्यांवर असून पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी या महिन्यात प्लास्टिकमुक्त शहराची मोहीम फत्ते करण्याचे आदेश दिले आहेत.

नवी मुंबईत आतापर्यंत दोन हजार ७०० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असून त्यांच्याकडून १२ लाख ८० हजार दंड वसूल करण्यात आला आहे. नवी मुंबईच्या अनेक भागांत आजही सर्रास प्लास्टिक विकले जात असून नेरुळमध्ये काही दिवसांपूर्वी याच कारवाईतून अधिकाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रकार झाला आहे.

राज्य सरकारने पाच वर्षांपूर्वी पन्नास मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकला बंदी घातली आहे. त्यामुळे काही भागांत प्लास्टिकमुक्तीचा जागर केला गेला असून काही खेडेगावांत ही बंदी तंतोतंत पाळली गेली आहे, पण नियोजनबद्ध शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईत ही बंदी शंभर टक्के झालेली नाही. गाव, ग्रामीण, झोपडपट्टी आणि शहरीकरणाने बनलेल्या नवी मुंबईत गाव व झोपडपट्टी भागांत या प्लास्टिकबंदीवर फारशी कारवाई होत नसल्याने दुकानदार सर्रास प्लास्टिकचा वापर करीत असल्याचे दिसून आले आहे. सर्व रेल्वे स्थानकांच्या बाहेर सकाळ-संध्याकाळ प्लास्टिकच्या पिशवीतून फळे विकली जात आहेत. त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याने हे प्रमाण वाढले आहे.

आयुक्त बांगर यांनी दोन प्रभाग अधिकाऱ्यांच्या बैठकीत प्लास्टिकमुक्तीचे लक्ष्य दिले आहे. त्यामुळे प्रभाग अधिकाऱ्यांची जबाबदारी वाढली आहे. एपीएमसी बाजारात प्लास्टिकचा मोठय़ा प्रमाणात वापर केला जात असल्याचे आढळून आले आहे. त्यासाठी त्या ठिकाणी दोन पथके देण्यात आली आहेत. प्लास्टिकमुक्तीसाठी पाच सूत्री कार्यक्रम ठरविण्यात आला असून दुकानदारांकडे हे प्लास्टिक आढळणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. याशिवाय प्लास्टिकमुक्तीसाठी उद्योजक, व्यापारी यांनी त्यांच्या क्षेत्रात प्लास्टिकमुक्तीची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. याच महिन्यात केंद्रीय पथक स्वच्छ भारत अभियानाचे सर्वेक्षण करण्यासाठी शहरात अचानक भेटी देणार असून प्लास्टिकमुक्ती हे पालिकेसमोर मोठे आव्हान आहे.

कारवाईत वाढ करण्याच्या सूचना

पालिकेच्या आठ प्रभाग अधिकाऱ्यांना प्लास्टिक वापरावर र्निबध घालण्यासाठी एका पोलिसासह पथक दिले आहे. त्यांच्याकडून कारवाई केली जात असून ती पुरेशी नाही. तरीही पालिकेने आतापर्यंत अडीच हजार किलो प्लास्टिक जप्त केले असून तेरा लाखांपर्यंत दंड वसूल केला आहे. ही संख्या या महिन्यात वाढण्याची शक्यता आहे.