ऑनलाइन तासाला ५५ टक्केच उपस्थिती

नवी मुंबई : सोमवारपासून महापालिकेच्या ऑनलाइन शाळा सुरू होत आहेत. मात्र गेल्या वर्षभरात ऑनलाइन तासाला फक्त ५५ टक्के विद्यार्थ्यांनीच हजेरी लावली आहे. उर्वरित ४५ विद्यार्थी हे संपर्काबाहेर होते. या विद्यार्थ्यांना यावर्षी शिक्षणप्रवाहात आणणे हे मोठे आव्हान राहणार आहे.

यासाठी महापालिका शिक्षण विभाग विविध उपाययोजना करीत आहे. विद्यार्थ्यांना नेट पॅक देण्याचाही विचार आहे. मात्र जर विद्यार्थ्यांकडे स्मार्ट मोबाईलच उपलब्ध नसेल तर या नेट पॅकचे करायचे काय? असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे.

नवी मुंबई महापालिकच्या ५४ प्राथमिक व २० माध्यमिक शाळा असून सुमारे ४० हजार विद्यार्थी आहेत. ऑनलाइन शिक्षणासाठी विविध उपाययोजण्यात आले. कृतीपत्रिकांच्या माध्यमातून व ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण देण्याचा प्रयत्न झाला. मात्र पालकांची आर्थिक परिस्थिती पाहता ऑनलाईन शिक्षण घेण्यात अनेक विद्यार्थ्यांना अडचणी येत

आहेत. घरात असलेला एकमेव मोबाईल, नेटपॅकसाठी पैसे नसणे,पालकांना रोजगार नसणे अशा अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणात गेल्या वर्षेभरात ५५ टक्केच विद्यार्थी सहभागी झाले तर ४५ टक्के विद्यार्थ्यांना हे ऑनलाईन शिक्षण मिळालेच नाही.

आगामी २०२१- २२  हे शैक्षणिक वर्ष आता सुरू होत आहे. सोमवारपासून ऑनलाइन शाळा सुरू होत आहेत. किमान पहिल्या सहामाहीत शाळा प्रत्यक्षात सुरू होणे अशक्य आहे. त्यामुळे पुढील काळातही ऑनलाइन शिक्षणच सुरू राहणार आहे.

मागील वर्षीचा अनुभव पाहता घेता नवी मुंबई महानगरपालिका शाळांमधील अधिकाधिक विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणात सहभागी होण्याकरिता शिक्षण विभगाचे पयत्न राहणार आहेत. यासाठी मोबाईलमध्ये आवश्यक असलेला नेट पॅकसाटी पालिका प्रत्येक महिन्याला १ हजार रुपये विद्यर्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ज्या मुलांच्या पालकांकडे मोबाईल नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी  प्रयत्न करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले. यावर्षी कृती पुस्तिकाही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. दर १५ दिवसांनी शिक्षक विद्यार्थ्यांच्या घरी भेट देऊन त्याने अभ्यास केलेली कृतीपुस्तिका घेतील व पुढील अभ्यासाची कृतीपुस्तिका त्याला उपलब्ध करून देतील. त्यातून त्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे मूल्यमापनही करता येणे शक्य होणार आहे. ऑनलाइन शिक्षण प्रक्रियेत उत्तम काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचेही सहकार्य पालिका घेणार आहे.

नवी मुंबई महापालिका ऑनलाइन शिक्षणासाठी सातत्याने प्रयत्नशील असून गेल्यावर्षी ऑनलाइन शिक्षणात ५५ टक्के विद्यार्थी सहभागी होते. त्यामुळे सर्वांना सहभागी करुन घेता यावे यासाठी नेट पॅक देण्याची योजना आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पालिका सज्ज आहे. सर्वांनाच ऑनलाइन शिक्षण देण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे.  -योगेश कडुस्कर, उपायुक्त शिक्षण विभाग