दूरध्वनीवरून खाटांची माहिती मिळणार; पालिकेचा आरोग्य विभाग सक्षम करण्यावर भर

नवी मुंबई : महापालिकेच्या वतीने प्रतिजन तपासण्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढविण्यात आल्याने शहरात करोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. या रुग्णांसाठी लागणारी पालिकेची आरोग्य यंत्रणा कमी पडत आहे. त्यामुळे मनुष्यबळ वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. यानंतर शहरातील करोना रुग्णाला दूरध्वनीवरून खाटा उपलब्ध करून  देण्याचा प्रयत्न पालिका करणार आहे. यासाठी ऑनलाइन माहितीफलक  तयार केला जात आहे. त्यासाठी प्रथम आरोग्य यंत्रणा सक्षम केली जात आहे.

नवी मुंबईतील रुग्णसंख्या २० हजारच्या आसपास गेली आहे. मृत्यूदर रोखण्याचा पालिका प्रयत्न करीत आहे.  यासाठी कृत्रिम श्वसन यंत्रणा असलेल्या खाटा आणि अतिदक्षता विभागातील खाटांची संख्या वाढविण्यावर भर दिला जात आहे. पालिका सक्षम आरोग्य यंत्रणा उभारण्यास प्राधान्य देत असल्याचे सांगण्यात आले.

नेरुळ येथील डी. वाय. पाटील रुग्णालयाशी अतिदक्षता विभागातील २०० खाटांसाठीचा सामंजस्य करार  पालिकेने केला आहे. यातील ८० खाटा या केवळ कृत्रिम श्वसनयंत्रणांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.  शहरातील पालिका आणि खासगी रुग्णालयात २०२ अतिदक्षता विभागातील खाटा राखीव ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, त्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे उपलब्ध नाहीत. वाशी येथील सिडकोच्या प्रदर्शनी केंद्रातील कोविड काळजी केंद्रात ५०० खाटा प्राणवायू पुरवठय़ासाठी तयार ठेवण्यात आल्या आहेत. शहरात अतिदक्षता आणि कृत्रिम श्वसन यंत्रणेचा तुटवडा भासत असल्याने पालिकेसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.

अतिदक्षता आणि कृत्रिम श्वसन यंत्रणा असलेल्या खाटांची सोय तातडीने  करता येण्याजोगी आहे. मात्र, आरोग्य सेवेसाठी लागणारे वैद्यकीय कर्मचारी पालिकेकडे उपलब्ध नाहीत. डॉक्टर आणि परिचारिका  आणि परिचर या पदांसाठी भरती सुरू आहे. १४ शल्यचिकित्सक डॉक्टर पालिका सेवेत येण्यास तयार झाले आहेत. ही सर्व यंत्रणा उभी राहिल्यानंतर पालिका  ऑनलाइन माहितीफलक उभारणार आहे.

त्यानुसार बाधित वा त्यांच्या नातेवाईकांनी पालिकेच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधल्यानंतर त्यांना त्यांच्या विभागातील प्रतिजन चाचण्या, लक्षणानुसार रुग्णालय यांची व्यवस्था तेथील क्षेत्रीय अधिकारी आणि विभाग अधिकारी करून देणार आहेत. सध्या पालिका उभारत असलेल्या सुविधांना काही मर्यादा आहेत. त्याबाबत काही नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत.

करोनाची लक्षणे आढळल्यास रहिवाशाने संपर्क साधल्यास त्याच्यासाठी पालिकेची यंत्रणा पुढील कार्यवाही करेल, याची कोणतीही खात्री दिली जात नाही. त्यामुळे मृत्यूदर कमी करण्यासाठी सक्षम यंत्रणा उभी करण्याचे काम पालिकेच्या वतीने सध्या सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

चाचण्यांसाठी आवाहन

पालिकेने प्रतिबंधित क्षेत्रात प्रतिजन  तपासण्या मोठय़ा प्रमाणात वाढविल्या आहेत. यानंतर सर्व सोसायटी आणि वसाहतींत या चाचण्या केल्या जाणार आहेत. त्यासाठी गृहसंस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.