22 July 2018

News Flash

नवी मुंबई पालिकेत नेतेपदासाठी मोर्चेबांधणी

पालिकेतील विरोधी पक्षनेता व सभागृह नेता निवडीचे वारे वाहू लागले आहेत.

विरोधी पक्ष व सभागृह नेतेपदासाठी रस्सीखेच

मागील महिन्यात झालेल्या महापौर निवडणुकीनंतर पालिकेत आता विरोधी पक्ष व सभागृह नेता बदलण्याचे वारे वाहू लागले आहेत. राष्ट्रवादीचे सभागृह नेते जयवंत सुतार यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडल्याने त्यांच्या जागी पक्षातील ज्येष्ठ नगरसेवक रवींद्र इथापे, अशोक गावडे, नेत्रा शिर्के, डॉ. नाथ यांच्यापैकी एका नगरसेवकाची वर्णी लागण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेता पदासाठी शिवसेनेत मोठी रस्सीखेच सुरू आहे. एम. मढवी, द्वारकानाथ भोईर, किशोर पाटकर, नामदेव भगत, सरोज पाटील, शिवराम पाटील, सोमनाथ वास्कर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. यात मढवी यांच्या नावाला पक्षश्रेष्ठींची पसंती मिळण्याची शक्यता आहे. या महिन्यात होणाऱ्या सर्वसाधारण सभेत सभागृह नेता जाहीर केला जाणार असल्याने त्याच वेळी विरोधी पक्षनेतादेखील बदलणयाची शक्यता आहे.

महापौरपदाच्या बोहल्यावर चढण्यासाठी भाजपाचे चार नगरसेवक फोडण्याच्या तयारीत असलेले विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांचा उधळलेला वारू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोखला. त्यामुळे चौगुले यांना महापौरपदाचा साधा उमेदवारी अर्ज भरता आला नाही. त्यामुळे चौगुले यांची तयारी वाया गेली. उपमहापौरपदाच्या मोबदल्यात काँग्रेसने राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याने महापौर, उपमहापौरपदाच्या निवडीचे सोपस्कर गेल्या महिन्यात पार पडले. त्यानंतर पालिकेतील विरोधी पक्षनेता व सभागृह नेता निवडीचे वारे वाहू लागले आहेत.

सभागृहातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे सभागृह नेता महापौर झाल्याने त्यांच्या जागी नवीन सभागृह नेत्याची निवड या महिन्यात केली जाणार आहे. त्यासाठी पक्षातील ज्येष्ठ व एकनिष्ठ नगरसेवकाची निवड केली जाणार आहे. याच वेळी शिवसेनेने विरोधी पक्षनेत्याचे नाव जाहीर करावे, असे प्रयत्न महापौराच्या वतीने सुरू आहेत. ही दोन नावे आल्यानंतर महापौर पुढील कालावधीसाठी सभागृह नेता व विरोधी पक्षनेता या दोन पदांना मंजुरी देतील अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्र पालिका अधिनियमात या दोन पदांना नवीन महापौरांची मंजुरी आवश्यक मानली गेली आहे.

सत्ताधारी राष्ट्रवादीच्या सभागृह नेतेपदाची नियुक्ती पक्षाचे येथील सर्वेसर्वा माजी मंत्री गणेश नाईक यांच्या आदेशाने होणार आहे. विरोधी पक्षनेतेपदाचे नाव मातोश्रीवरून जाहीर करण्यात येणार आहे. यात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका महत्त्वाची आहे. यापूर्वी पालिकेच्या सभागृहनेतेपदाची मुदत जेमतेम एक वर्षे ठेवण्यात आली होती. चौगुले यांना पक्षाने अडीच वर्षांपेक्षा जास्त संधी दिल्याने त्यांच्या बदलाचे वारे पक्षात जोमात वाहू लागले आहेत. त्यासाठी शिंदे व खासदार राजन विचारे यांच्याकडे साकडे घातले जात आहे. यात ऐरोलीचे नगरसेवक व आमदारकीचे इच्छुक उमेदवार एम. के. मढवी आघाडीवर आहेत. त्याच्यापाठोपाठ घणसोलीचे नगरसेवक गटनेते द्वारकानाथ भोईर, नेरुळचे नामदेव भगत, वाशीचे किशोर पाटकर, सानपाडय़ाचे सोमनाथ वास्कर, कोपखैरणे येथील शिवराम पाटील, बेलापूरच्या सरोज पाटील यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे. यांपैकी एका नावावर शिक्कामोर्तब होऊन सर्वसाधारण सभेत महापौरांच्या वतीने हे नाव जाहीर केले जाणार आहे.

शिवसेनेत बंडखोरीची शक्यता?

महापौर निवडणुकीच्या काळात चौगुले यांचा स्थायी समिती सदस्यपदाचा राजिनामा पक्षाने घेऊन ठेवला आहे. माजी सभापती शिवराम पाटील यांची या जागी वर्णी लावली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चौगुले यांना विश्वासात न घेता विरोधी पक्षनेत्याची निवड केल्यास पक्षात बंडखोरी होण्याची शक्यता आहे.

First Published on December 7, 2017 1:10 am

Web Title: nmmc opposition leaders nmmc auditorium leaders