तिळगुळासोबत कामांच्या पत्रकांचेही घरोघरी वाटप

नवी मुंबई : पालिकेची निवडणूक तीन महिन्यावर येऊन ठेपल्याने विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांनी मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर प्रचाराला सुरुवात केली आहे. यात हळदी-कुंकू समारंभापासून ते घरोघरी तिळगूळ वाटपाच्या कार्यक्रमाचा समावेश आहे. नेरूळमधील एका नगरसेवकाने तिळगुळाच्या पाकिटासोबत मागील पाच वर्षांत केलेल्या कामाचे पत्रकही प्रभागातील घराघरांत वाटप केले आहे. हे वाटप आजूबाजूच्या तीन प्रभागांत करून त्यात प्रभाव पाडण्याचा प्रयत्नही यातून साहित्यांच्या वाटपातून केला आहे.

नवी मुंबई पालिकेची एप्रिलच्या दुसऱ्या आठवडय़ात सहावी निवडणूक होत आहे. एकूण १११ प्रभाग संख्या असलेल्या या नवी मुंबईतील या प्रभागांचे डिसेंबर महिन्यात होणारे आरक्षण राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पुढे ढकललेले आहे. त्यामुळे स्थागित करण्यात आलेले प्रभाग व उमेदवार आरक्षण सोडत जानेवारी अखेरीस होण्याची शक्यता आहे.

प्रभाग आरक्षणाचा अंदाज बांधून अनेक विद्यमान नगरसेवकांनी प्रचाराचे नारळ वाढविले आहेत तर इच्छुकांनी सध्या समाजमाध्यमांवर धुरळा उडविला आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी प्रभागातील नागरी कामांची माहिती देण्याचा हा प्रयत्न आहे. आचारसंहितेनंतर प्रभागातील उद्घाटनांचा बार उडविता येणार नसल्याने अनेक नगरसेवकांनी प्रभागातील पदपथ, रस्ते, दिवाबत्ती, गटार दुरुस्ती, उद्यान, खेळाचे साहित्य, हायमास्ट यांसारख्या नागरिकांच्या सुविधांची पूर्तता करण्यास घेतली आहे.

या कामांच्या शुभारंभप्रसंगी प्रचाराचा नारळ वाढविले जात आहे. काम पूर्ण झाल्यास भाषणबाजीला जोर येत आहे. सध्या प्रत्येक प्रभागात नागरी कामांचे फलक लागल्याचे चित्र आहे.

नेरूळमधील एक विधानसभा निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नगरसेवकाने मकरसंक्रांतीचे औचित्य साधून प्रत्येक घरात दोन तिळाचे लाडू कागदी पाकिटात टाकून त्यासोबत नागरी कामांविषयीचे रंगीत पत्रकही वाटले आहे. या प्रचारासह आता महिलांच्या हळदीकुंकूच्या कार्यक्रमांचा अक्षरश: धूमधडाका सुरू झाला आहे. प्रभाग तेथे हळदीकुंकू असे चित्र आहे.

आमदारांकडूनही महोत्सव

प्रभाग पातळीवर सुरू असलेला हा प्रचार राजकीय पक्षांच्या पातळीवरही सुरू आहे. आमदार गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे यांनी विधानसभा मतदारसंघात सराव परीक्षा आणि महोत्सवांचे आयोजन केले आहे.परीक्षा दरवर्षी घेतली जाते, मात्र यंदा त्याचे आयोजन लवकर करण्यात आले आहे. बेलापूरच्या आमदार म्हात्रे यांनीही दरवर्षीप्रमाणे बेलापूरमध्ये महोत्सवाचे आयोजन केले आहे. या दोन नेत्यांचे मतदारसंघांतील तिकीट वाटपावरून कलगीतुरा रंगण्याची चिन्हे आहेत. मनसेने पण यंदा पालिका निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून नागरी समस्या सोडविण्यासाठी विविध प्रकारची आंदोलने केली जात आहेत.