नवी मुंबई महापालिकेच्या शाळांतील १४ शिक्षक पदोन्नतीच्या प्रतीक्षेत

नवी मुंबई महापालिकेच्या १७ माध्यमिक शाळांपैकी अवघ्या दोन शाळांना मुख्याध्यापक असून उर्वरित १५ शाळांमध्ये मुख्याध्यापकपदाची जबाबदारी पेलणाऱ्या शिक्षकांना अद्याप पदोन्नतीच देण्यात आलेली नाही. त्यामुळे ते मुख्याध्यापकाचे काम करत असूनही त्यांना दाम मात्र शिक्षकाचे मिळत आहे. पालिकेच्या प्रशासन विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे १५ शिक्षकांची पदोन्नती गेली कित्येक वर्षे रखडलेली आहे. या शैक्षणिक वर्षांत तरी न्याय मिळेल का, असा प्रश्न या प्रभारी मुख्याध्यापकांना पडला आहे.

एकीकडे संपूर्ण राज्यभरासह पालिका शाळांची पटसंख्या दिवसेंदिवस घटत असताना दुसरीकडे नवी मुंबई महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या मात्र दरवर्षी वाढतच आहे. प्राथमिक विभागाला शासनाचे अनुदान आहे. तर माध्यमिक शाळा ऐच्छिक विनाअनुदानित पद्धतीने सुरू आहेत. महापालिकेने २००६-०७मध्ये नेरुळ व ऐरोली येथे माध्यमिक शाळा सुरू केल्या. त्यानंतर आजपर्यंत रबाळे, दिघा, दिवाळे, सानपाडा, वाशी, शिरवणे, घणसोली, कोपरखैरणे सेक्टर- ७, करावे, तुर्भे, कोपरखैरणे सेक्टर-५, खैरणे, महापे, तुर्भे स्टोअर, श्रमिकनगर अशा एकूण १७ शाळा सुरू झाल्या आहेत. नव्या शैक्षणिक वर्षांत पावणे येथे १८ वी माध्यमिक शाळा सुरू होणार आहे. पालिका शिक्षण विभागाअंतर्गत ५३ प्राथमिक शाळा व ११६ बालवाडी वर्ग आहेत. तर पालिकेच्या १७ माध्यमिक शाळांमधून फक्त २ मुख्याध्यापक, १५ प्रभारी मुख्याध्यापक, ३५ साहाय्यक शिक्षक, ३२ ठोक मानधनावरील शिक्षक, ३१ शिक्षणसेवक कार्यरत आहेत.

२८ ऑगस्ट २०१५च्या निकषांनुसार मुख्याध्यापकांची १६ पदे मंजूर असताना पालिका प्रशासन या प्रभारी मुख्याध्यापकांना पदोन्नती देण्यास टाळाटाळ करत आहे. या प्रभारी मुख्याध्यापकांनी पालिका आयुक्तांकडेही पदोन्नतीची पत्राद्वारे मागणी केली आहे.

खासगी शाळांमध्ये येणारी मुले व त्यांचे पालक त्या पालकांचे शिक्षण यांचा विचार केला व महापालिकेत येणारी मुले व त्यांची परिस्थिती यांचा विचार केला तर पालिका शाळांतील मुलांनी मोठी मजल मारली आहे. महापालिकेच्या शाळेतील दहावीचे निकाल हे ९० टक्कय़ांपर्यंत आहेत. हे या शाळांमध्ये शिकवणारे शिक्षक, मुख्याध्यापक व मुलांच्या पालकांचे यश आहे. त्यामुळे देशाचे भविष्य घडविणाऱ्या शिक्षकांना नियमानुसार मुख्याध्यापकपदी पदोन्नती द्यायला हवी.

 – सुधाकर सोनावणे, माजी महापौर  

पालिका शाळेतील निकाल चांगले लागत आहेत. हे शिक्षक, पालक व प्रशासनाचे यश आहे. नुकताच शासनाने पदोन्नतीबाबतचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे माध्यमिक शाळांमधील प्रभारी मुख्याध्यापकांनाही नियमानुसार पदोन्नती देण्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल.

संदीप संगवे, शिक्षणाधिकारी, पालिका शिक्षण विभाग