17 October 2019

News Flash

बोगस डॉक्टरांची दुकानदारी सुरूच?

बिहार व इतर राज्यांतून पदवी मिळवलेल्या बोगस डॉक्टरांचे प्रकार काही वर्षांत उघडकीस आले आहेत.

प्रतिनिधिक छायाचित्र

कारवाईनंतरही १६ जणाकडून पुन्हा व्यवसाय

संतोष जाधव, नवी मुंबई : महापालिकेकडे असलेल्या मर्यादित अधिकारांमुळे शहरांतून बोगस डॉक्टरांची ‘दुकाने’ राजरोस सुरू आहेत. नवी मुंबईत महापालिकेने आतापर्यंत अशा २७ डॉक्टरांवर कारवाई केली, मात्र त्यापलीकडे त्यांना अधिकार नसल्याने न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर यातील १६ डॉक्टरांनी पुन्हा खासगी वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. ही कारवाईतून उघड झालेली आकडेवारी असली तरी शहरात मोठय़ा प्रमाणात बोगस डॉक्टरांचा धंदा सुरू असण्याची शक्यता आहे.

बिहार व इतर राज्यांतून पदवी मिळवलेल्या बोगस डॉक्टरांचे प्रकार काही वर्षांत उघडकीस आले आहेत.

महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिसनर्स अ‍ॅक्ट १९६१ नुसार एमबीबीएस व एमडी डॉक्टरांनी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे तसेच बीएएमएस, डीओएमएस यांनी महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसनकडे, बीएचएमएस व डीएचएमएस पदवीधारकांनी महाराष्ट्र होमिपेथिक कौन्सिलकडे, बीडीएस व एमडीएस पदवीधारकांनी महाराष्ट्र डेन्टल कौन्सिलकडे नोंदणी केली की, पदवीप्राप्त डॉक्टरांना ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रात व्यवसाय करता येतो. महापालिका क्षेत्रात बॉम्बे नर्सिग होम अ‍ॅक्टनुसार नर्सिग व सोनोग्राफी सेंटर्सना पालिकेकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. महापालिकेकडे नोंदणी बंधनकारक नसल्याने शहरात नक्की किती खासगी वैद्यकीय डॉक्टर व्यवसाय करतात याची ठाम संख्या महापालिकेकडे नाही. स्थानिक नर्सद्वारे केलेल्या एका पाहणीत ज्यांची कागदपत्रे पालिकेकडे प्राप्त झाली आहेत त्यांची संख्या ११९२ पर्यंत आहे. परंतु यापेक्षा अधिक प्रॅक्टिसनर्स शहरात असल्याचे चित्र आहे. तसेच कागदपत्रे जमा केल्यावर हे डॉक्टर खरे की बोगस हे सांगता येत नाही. पालिकेला शंका आल्यास व तक्रार प्राप्त झाल्यावरच जमा केलेली कागदपत्रे मेडिकल कौन्सिलकडून तपासणी करून महापालिका चौकशी करून बोगस आढळल्यास डॉक्टरांवर गुन्हा दाखल करते तर पोलीस हे त्याचा तपास करतात. आतापर्यंत फक्त २७ डॉक्टरांवर पालिकेने गुन्हे दाखल केल्याची आकडेवारी उपलब्ध आहे. असे असले तरी वर्षांनुवर्ष याचा तपास सुरूच राहतो. त्या दरम्यान न्यायालयातून ‘स्टे’ मिळाल्यावर हे डॉक्टर पुन्हा शहरात व्यवसाय सुरू करतात. अशा प्रकारे १६ डॉक्टरांनी पुन्हा व्यवसाय सुरू केल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने ‘लोकसत्ता’ला दिली आहे.

होमिओपथी डॉक्टरही सर्व प्रकारची अ‍ॅलोपथीची औषधे देत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे सर्व नियमांना बगल देत अनेक क्लिनिक सुरू असून बोगस कोण व खरा डॉक्टर कोण? हे सामन्य रुग्णांना कळणार तरी कसे? असा प्रश्न आहे.

‘क्लिनिकल इस्टॅब्लेसमेंट अ‍ॅक्ट’ आल्यास निर्बंध

शहरात प्रॅक्टिसनर्सना महाराष्ट्र कौन्सिलकडे नोंदणी केल्यानंतर राज्यभरात प्रॅक्टिस करता येते. पालिका अशा डॉक्टरांकडून कागदपत्रे घेते. परंतु बोगस डॉक्टर कोण? याचा थांगपत्ता लागत नाही. परंतु चुकीच्या उपचारपद्धतीमुळे जर काही प्रश्न निर्माण झाल्यास सर्वच डॉक्टरांकडे शंकेच्या नजरेने बघितले जाते. त्यामुळे नवीन क्लिनिकल इस्टॅब्लेसमेंट अ‍ॅक्ट लागू झाला तरच आशा प्रॅक्टिसनर्सवर कडक निर्बंध येतील, असे नवी मुंबई डॉक्टर्स फाऊं डेशनचे डॉ.अरुण कुऱ्हे यांनी सांगितले.

जमा केलेल्या कागदपत्रांवरून शंका आल्यास पालिका तक्रार दाखल करते. शहरात आतापर्यंत अशा २७ डॉक्टरांवर कारवाई करुन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परंतु न्यायालयातून स्टे घेऊन त्यातील १६ डॉक्टरांनी पुन्हा व्यवसाय सुरू केले आहेत. पालिकेच्या अधिकारात व नियमावलीत बोगस डॉक्टरांबाबत जेवढे निर्बंध घालता येणे शक्य आहे त्या सर्व उपाययोजना पालिका करत आहे.

 – डॉ. दयानंद कटके, वैद्यकीय अधिकारी, पालिका

First Published on January 12, 2019 1:26 am

Web Title: nmmc taken action against 27 bogus doctors in navi mumbai